
पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 20 लाख शेतकऱ्यांना लवकरच प्रोत्साहन अनुदान दिले जाईल, अशी घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज केली. कृषिमंत्री भरणे यांनी नाशिक दौऱ्यावर असताना ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱयांना मिळणारी मदत, जनावरांच्या चाऱयाचे नियोजन यावर स्पष्ट भूमिका मांडली. जनावरांना चारा कमी पडू नये यासाठी उपाययोजना करण्यात येत असून शेतकऱयांना मोफत बियाणे पुरवले जात आहे, असे त्यांनी सांगितले. शेतकऱयांच्या वीजपुरवठय़ाच्या प्रश्नावरही कृषिमंत्री भरणे यांनी भाष्य केले. शेतकऱयांना 24 तास वीजपुरवठा करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र वीजपुरवठय़ामुळे सर्वसामान्य नागरिकांना किंवा इतर घटकांना त्रास होणार नाही याची काळजी महावितरणने घ्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.


























































