
राजधानी दिल्लीत सलग दोन दिवस किमान तापमान एकेरी अंकात म्हणजेच सुमारे 9 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असले तरी,दीर्घकाळ टिकणारी थंडीची लाट येण्यासाठी दिल्लीकरांना आणखी किमान दोन आठवडे प्रतीक्षा करावी लागणार आहे. सक्रिय पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावाचा अभाव, शहरी उष्णता आणि प्रशांत महासागरात निर्माण झालेली प्रबळ ‘एल निनो’ स्थिती यामुळे यंदा थंडीचा कडाका लांबल्याचे हवामान व पर्यावरण तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
सर्वसाधारणपणे प्रत्येक वेळी वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर-पश्चिम हिंदुस्थानातून पुढे सरकल्यानंतर पाऊस आणि पर्वतरांगांमध्ये हिमवृष्टी होते; त्यानंतर थंड वायव्य वारे वाहतात जे मैदानी प्रदेशातील रात्रीचे तापमान खाली खेचतात. तज्ज्ञांच्या मते, या नोव्हेंबरमध्ये ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात अनुपस्थित आहे. ‘स्कायमेट वेदर’चे हवामानशास्त्र आणि हवामान बदल विभागाचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी सांगितले की, नोव्हेंबरमध्ये सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्स नव्हता; केवळ 14 नोव्हेंबर रोजी एका प्रणालीमुळे हलका पाऊस पडला. निरभ्र आकाश आणि प्रखर सूर्यप्रकाशामुळे दिवसाचे तापमान जास्त राहिले, तर पश्चिम हिमालयात जोरदार बर्फवृष्टी झाली नाही. थंड उत्तर व वायव्य वाऱ्यांमुळे दिवसाचे तापमान किंचित खाली आले असले तरी एकूणच तापमान सरासरीपेक्षा अधिकच आहे. दरम्यान, 2026 मध्ये जागतिक स्तरावर अत्यंत प्रबळ ‘एल निनो’ स्थिती पाहायला मिळत असून पॅसिफिक महासागरातील निनो-3.4 निर्देशांक +2.5 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. अमेरिकेच्या ‘एनओएए’नुसार, जानेवारी ते मार्च 2027 दरम्यान ही प्रबळ ते अतिप्रबळ ‘एल निनो’ स्थिती कायम राहण्याची शक्यता 79 टक्क्यांहून अधिक आहे. यामुळे जागतिक तापमान सरासरीपेक्षा अधिक असल्याचे पलावत यांनी नमूद केले; मात्र दिल्लीतील थंडीच्या मंद आगमनासाठी केवळ ‘एल निनो’ला जबाबदार धरता येणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
‘टेरी’च्या सेंटर फॉर क्लायमेट मॉडेलिंगचे फेलो आणि एरिया कन्व्हेनर डॉ. कागिता वेंकटरामणा यांच्या मते, उबदार सुरुवातीचा काही भाग ‘एल निनो’मुळे असला तरी बहुतांश कारणे इतर आहेत. 2 डिसेंबरपूर्वी उत्तर-पश्चिम हिंदुस्थानात सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्स अपेक्षित नसून त्यानंतरही ‘ईसीएमडब्ल्यूएफ’ मॉडेलनुसार केवळ कमकुवत प्रणाली दिसत आहेत. दीर्घकालीन तापमानवाढ, शहरातील उष्णता, दमट हवा आणि धूर यामुळे रात्रीचे तापमान तुलनेने सौम्य राहते. 25 नोव्हेंबर रोजी सबट्रॉपिकल जेट स्ट्रीमचा गाभा मध्य भारतावर होता. नोव्हेंबर 2024 मध्ये ‘एल निनो’ नसतानाही गेल्या पाच वर्षांतील सर्वात उबदार नोव्हेंबर नोंदवला गेला, तर नोव्हेंबर 2024 मध्ये ‘ला निना’ स्थितीत पाच वर्षांतील सर्वात थंड नोव्हेंबर राहिला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या हवामान मॉडेलनुसार, 2 डिसेंबरपर्यंत निरभ्र आकाशाखाली रात्रीचे तापमान हळूहळू घसरेल; भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार रात्रीचे तापमान सरासरीच्या आसपास किंवा किंचित खाली राहू शकते, मात्र थंडीची लाट नाही. 10 डिसेंबरपर्यंत पश्चिम हिमालयात केवळ कमकुवत प्रणाली राहण्याची शक्यता असून 6-7 डिसेंबरच्या सुमारास अधिक प्रबळ प्रणालीचा आधीचा अंदाज आता हवामान चार्टवर दिसत नाही, तर आर्क्टिक आणि खंडीय थंड हवा सायबेरिया व मंगोलियावरच अडकलेली आहे. 10 डिसेंबरनंतरच, सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि त्यानंतरच्या थंड वायव्य वाऱ्यांमुळे कडाक्याची थंडी जाणवू शकते. ‘एल निनो’मुळे एकूणच थंडीच्या लाटांचे प्रमाण कमी राहिले तरी जानेवारी हा थंडीच्या लाटेचा मुख्य महिना राहतो आणि ‘एल निनो’ काळातही जानेवारी 2024 प्रमाणे दीर्घकाळ धुके आणि थंडीची लाट येऊ शकते, असे डॉ. वेंकटरामणा यांनी सांगितले.




























































