
क्रिकेटमधील विक्रमवीर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरने हिंदुस्थानकडून खेळताना एका पेक्षा एक वरचढ खेळी साकारल्या आहेत. सचिनच्या योगदानामुळे हिंदुस्थानी संघाने अनेक सामने एकहाती जिंकले आहेत. सचिनमुळेच देशात आज क्रिकेट हा धर्म मानला जातो. मात्र तुम्हाला हे माहित आहे का की, सचिनने पाकिस्तानी संघाकडूनही एक सामना खेळला आहे आणि तो देखील हिंदुस्थानी संघाविरोधात. आश्चर्य वाटलं ना. मात्र हे खरं आहे.
20 जानेवारी 1987 ला मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या गोल्डन ज्युबिली कार्यक्रमादरम्यान हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये एक सराव सामना आयोजित करण्यात आला होता. सामन्यादरम्यान पाकिस्तानी संघामध्ये एक खेळाडू कमी होता. त्यावेळी सचिन तेंडुलकरला बदली खेळाडू म्हणून पाकिस्तानकडून क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरावे लागले होते. सचिन तेंडुलकर तेव्हा 13 वर्षाचा होता.
#HappyBirthdaySachin सचिनच्या नावावरील वर्ल्डकपमधील ‘हे’ 4 विक्रम मोडणे केवळ अशक्य
पाकिस्तान आणि हिंदुस्थानचे खेळाडू एकाच हॉटेलमध्ये आराम करण्यासाठी थांबले होते. पाकिस्तान संघाचा कर्णधार इम्रान खान याने हिंदुस्थान संघाचा कर्णधार हेमंत कनकरे यांना दोन ते तीन खेळाडू कमी असल्याची माहिती दिली. त्यामुळे क्षेत्ररक्षणासाठी बदली खेळाडू देण्याची मागणी केली.
त्यावेळी खुशरू वसानिया आणि सचिन तेंडुलकर शेजारी उभे होते. सचिनने हेमंत यांना मी क्षेत्ररक्षणाला जाऊ का असे विचारले. सचिनने त्या सामन्यात पाकिस्तानकडून 25 मिनिटं क्षेत्ररक्षण केलं होतं. स्वत:च्या आत्मचरित्रात सचिनने एक बदली खेळाडू म्हणून पाकिस्तानकडून खेळल्याचा किस्सा सांगितला आहे.




























































