जीएसटी लागू होताच मुंबईच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षेलाच पडले भगदाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sanjay-raut

सामना ऑनलाईन । मुंबई

जीएसटी लागू होताच मुंबईच्या वेशीवर होणारी जकात वसुली थांबवण्यात आली आहे. जकात नाक्यावरील अधिकारी आणि पोलिसांना हटवण्यात आले आहे. जकात नाक्यांवर बंदोबस्त नसल्यामुळे मुंबईमध्ये राजरोसपणे प्रवेश करणे अगदी दहशतवाद्यांसाठीही खूप सोपे झाले आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षेलाच भगदाड पडले आहे. या भगदाडात कोणीही घुसून घातपात घडवू शकतो, अशी भीती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

‘एक देश, एक कर’च्या नावाखाली जीएसटी देशभरात लागू झाला आहे. संसदेत शिवसेनेच्या पाठिंब्याने जीएसटी विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. मुंबई महानगरपालिकेची आर्थिक घडी विस्कटू नये यासाठी विधेयकात आवश्यक त्या तरतुदी शिवसेनेने करुन घेतल्या आहेत. मात्र जकात नाक्यांवरील बंदोबस्त लगेच हटवण्यात आल्यामुळे मुंबईच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षेलाच भगदाड पडले आहे. या भगदाडाला बुडवण्यासाठी ठोस उपाय तातडीने करण्याची आवश्यकता आहे. जीएसटीचा जल्लोष करणाऱ्यांनी मुंबईची काळजी घ्यावी. मुंबईत दुसरा एखादा कसाब घुसणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले.