
महाराष्ट्राच्या अनेक भागांत थंडीची लाट येणार असून काही ठिकाणी पारा थेट 4.5 अंश सेल्सिअसपर्यंत नीचांकी खाली येणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुंबईमध्येही पारा 15 अंश सेल्सिअसपर्यंत राहणार असल्याने हुडहुडी भरणार आहे. पुढील आठवडाभर ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात कोकणापासून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे, तर मुंबई शहरासह दोन्ही उपनगरांमध्ये थंडी वाढली आहे. अनेक ठिकाणी पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. यातच सकाळी धुक्याच्या चादरीमुळे दृश्यमानता कमी होत आहे.
दरम्यान, संपूर्ण देशातच थंडी वाढली असून कश्मीरमध्येही बर्फवृष्टी सुरू झाली आहे. यामुळे श्रीनगर विमानतळावरून 15 विमान उड्डाणे रद्द करावी लागली. दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, पंजाब आणि हरयाणामध्येही गारठा वाढला आहे.
आठ जिह्यांना सतर्कतेचा इशारा
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱयानुसार धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर या जिह्यांत तापमानामध्ये मोठी घट होणार आहे. या ठिकाणी किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदवले जाऊ शकते. उत्तरेकडून येणाऱया शीत लहरींमुळे ही स्थिती निर्माण झाली असल्याचे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आजचे किमान तापमान
मुंबई – 15.2 अंश सेल्सिअस
नाशिक – 8.8 अंश सेल्सिअस
नागपूर – 9.2 अंश सेल्सिअस
कोल्हापूर – 15.3 अंश सेल्सिअस
माथेरान – 17.4 अंश सेल्सिअस
महाबळेश्वर – 12.1 अंश सेल्सिअस
मालेगाव – 8.4 अंश सेल्सिअस

























































