अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, कर्जतमध्ये खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात अज्ञात व्यक्तीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे.

गुरुवारी सकाळी अकरा वाजता काही गुराख्यांना कर्जत जामखेड मार्गावर निंबोडी शिवारात जळालेला मृतदेह आढळला. हा मृतदेह रस्त्याच्या कडेला झुडपात आढळून आला. अर्धवट जळालेल्या अवस्थेतील पुरुषाचा मृतदेह असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. तसेच या व्यक्तीचे वय ३५ ते ४० वर्ष असण्याची शक्यता आहे. या मृतदेहाच्या गळ्यात जळालेल्या अवस्थेत दोरी आढळून आली आहे. त्यामुळे फाशी देऊन अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

फाशी किंवा हत्येनंतर ओळख लपवण्यासाठी मृतदेह जाळण्यात आला आहे का या दृष्टीनेही तपास सुरू आहे.

याप्रकरणी वैद्यकीय तपासणी पथकानं पाहणी करून नमुने ताब्यात घेतले आहे. तसंच कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

यापूर्वीही कर्जतला दूरगाव धरणाच्या परिसरात आईसह दोन बालकांचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. मात्र अनेक महिन्यांनंतरही तिघांच्या मृतदेहाची ओळख पटली नाही आणि मारेकऱ्यांना पकडण्यात अपयश आलं आहे. त्यातच पुन्हा अज्ञात पुरुषाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.