
बांगलादेशात तीन दिवसांपूर्वी हल्ला करून पेटवून दिलेले हिंदू व्यापारी खोकन दास यांचा आज अखेर मृत्यू झाला. त्यांच्यावर ढाका येथील बर्न इन्स्टिटय़ूटमध्ये उपचार सुरू होते. दास यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून उसळलेल्या हिंसाचारात मृत्यू झालेल्या हिंदूंची संख्या आता चारवर पोहोचली आहे.
50 वर्षी खोकन दास यांच्यावर 1 जानेवारी रोजी हल्ला करण्यात आला होता. दास हे तिलोई गावातील रहिवासी होते. केउरभंगा येथे त्यांचा मोबाईल बँकिंगचा व्यवसाय होता. ते औषधांचेही दुकान चालवत होते. ते दुकान बंद करून ऑटो रिक्षाने घरी परतत असताना हिंसक जमावाने त्यांना ढकलून दिले आणि अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जाळले होते. हल्लेखोरांनी दास यांना जाळल्यानंतर त्यांनी बाजूला असलेल्या तलावात उडी मारली होती. मात्र ते गंभीररीत्या जळाले होते. तीन दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली.
15 दिवसांत 4 हिंदूंची हत्या
बांगलादेशात हिंदूंवरील हल्ले गेल्या काही दिवसांमध्ये वाढले आहेत. 15 दिवसांमध्ये 4 हिंदूंची हत्या झाली आहे. दीपू चंद्र दास याची 18 डिसेंबरला हत्या झाली होती. त्यानंतर अमृत मंडल याची 24 डिसेंबर रोजी आणि 29 डिसेंबरला बजेंद्र बिस्वास यांची गोळी झाडू हत्या करण्यात आली होती. आज खोकन दास यांचा मृत्यू झाला.

























































