>> गणेश आचवल
सध्या कलर्स मराठीवर ‘सिंधुताई माझी माय’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेत हरबाजी ही व्यक्तिरेखा साकारणारा कलावंत म्हणजे अतुल आगलावे… एक प्रॉमिसिंग चेहरा…
लहानपणापासूनच अतुलला अभिनयाची आवड होती. शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात किंवा एकांकिका नाटक अशा स्पर्धांत त्याचा सातत्याने सहभाग असायचा. स्पर्धांमध्ये भाग घेतानाच अंबरनाथ येथील एका नाटकाच्या ग्रुपमध्ये तो सहभागी झाला. तो म्हणतो, ‘‘मी हळूहळू अभिनयाप्रमाणेच नाटकाच्या इतर बाजू म्हणजे प्रकाशयोजना, नेपथ्य, संगीत याकडेदेखील लक्ष देऊ लागलो. त्यातूनच ‘सही रे सही’, ‘लोच्या झाला रे’, ‘यू टर्न’ अशा व्यावसायिक नाटकांचे म्युझिक ऑपरेट करणे, तसेच प्रकाशयोजनेसाठी सहाय्य करणे ही कामे मला मिळत गेली. एकांकिका स्पर्धा या एखाद्याचे भविष्य घडवतात हे माहीत असल्याने मी आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सीएचएम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथून सादर झालेली ‘ही वस्ती सस्ती’ ही एकांकिका मला ओळख देणारी ठरली. याच एकांकिकेतील माझे काम पाहून मला ‘लज्जा’ ही मालिका मिळाली.’’
अतुलने नंतर विविध मराठी चित्रपटांत काम केले. ‘आम्ही का तिसरे’ या तृतीय पंथीयांच्या जीवनावरील चित्रपटातील त्याची भूमिका लक्षात राहणारी होती. कलर्स मराठीवरील ‘तू माझा सांगाती’ या मालिकेत अतुलने विठ्ठलाची भूमिका केली. पंढरपूरचा विठुराया हा विविध रूपांत भक्तांसाठी प्रकटत असतो. याच मालिकेतून अतुलला विठ्ठलाने घेतलेली विविध रूपे सादर करता आली. ‘योग योगेश्वर जय शंकर’ या मालिकेत अतुलने शंकर महाराजांच्या वडिलांची भूमिका केली.
सध्या साकारत असलेल्या हरबाजी या भूमिकेविषयी अतुल म्हणतो, ‘सिंधुताई माझी माय’ या मालिकेत सिंधुताईंच्या पतीची म्हणजे हरबाजी या व्यक्तीची मी भूमिका करत आहे. हरबाजी अशिक्षित आहे. हरबाजी छळ करत नाही. त्याचे बायकोवर खूप प्रेम आहे, पण त्याचा नाईलाज होतो आणि चिंधीच्या होणाऱया छळाकडे दुर्लक्ष करताना त्याला खूप त्रास होत असूनही तो काही करू शकत नाही, असा या भूमिकेचा ग्राफ म्हणता येईल. मालिकेच्या निमित्ताने मी वैदर्भीय भाषा शिकलो.’’
अतुलने ‘धनगरवाडा’, ‘ नशीबवान’ या चित्रपटांतदेखील भूमिका केल्या आहेत. भविष्यात अशाच विविध प्रोजेक्टसमधून अतुल आपल्यासमोर येणार आहे.