सातपुडा भवनात भीषण आग, मदतीसाठी मध्य प्रदेश सरकारचे हवाई दलाला साकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील सातपुडा भवनात सोमवारी दुपारी चारच्या सुमारास भीषण आग लागली होती. सायंकाळपर्यंत आगीने उग्र रूप धारण केले होते. तिसर्‍या मजल्यावरून आगीच्या ज्वाळा सहाव्या मजल्यापर्यंत पसरल्या होत्या. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर शॉर्ट सर्किट झाले होते ज्यामुळे एसीचा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. या स्फोटानंतर आग वाढतच गेली.

ही आग इतकी भीषण होती की तब्बल 14 तासांनंतर त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणणे शक्य होत नव्हते, ज्यामुळे लष्कराची मदत घेण्याचा मध्य प्रदेश सरकारने निर्णय घेतला होता. संध्याकाळी तिथले मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही आग विझवण्यासाठी हवाई दलाला मदत करण्याचे निर्देश देण्यात आले. यानंतर आग विझवण्यासाठी रात्री उशिरा एएन 32 विमान आणि एमआय 15 हेलिकॉप्टरला भोपाळला रवाना करण्यात आली.

सातपुडा भवनला लागलेल्या या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या आगीमुळे सरकारच्या दृष्टीने मोठी हानी झाली आहे. या इमारतीला ज्या ठिकाणी आग लागली तेथे मध्य प्रदेशातील आदिवासी कल्याण विभाग, वाहतूक विभाग आणि आरोग्य विभागाची कार्यालये आहेत. यामध्ये ठेवलेली कागदपत्रे व कार्यालयातील फर्निचर आगीमुळे जळून खाक झाले आहे.