
शिवसेना-‘मनसे’-राष्ट्रवादी युतीची प्रचंड जाहीर सभा रविवारी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर होत आहे. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तोफा धडाडणार आहेत. या सभेत हे दोन नेते काय बोलणार याबाबत शिवसैनिक आणि जनतेमध्ये उत्सुकता आहे. या सभेसाठी मोठा जनसागर शिवतीर्थावर लोटला आहे. या सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी घणाघाती भाषण करत भाजपसह महायुतीच्या खोट्या प्रचाराचा बुरखा फाडला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवतीर्थावर प्रचंड गर्दी होत आहे. कोणी कितीही प्रचार केला, तरीही हा क्षण मुंबई आणि महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे एकत्र येत मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी शिवतीर्थावर बोलणार आहेत. ही निवडणूक मराठी माणसासाठी, मराठी अस्मितेसाठी, मुंबईची आणि महाराष्ट्राची आहे, त्यामुळी निवडणूक महत्त्वाची आहे. तसेच ही निवडणूक गटार, वॉटर मीटर यासाठी आहे. त्यामुळे इतर कोणत्याही विषयाकडे लक्ष देऊ नका, असे त्यांनी सांगितले.
भाजपचा प्रचार पाहिला तर आपल्यात आणि त्यांच्यात फरक स्पष्टपणे दिसत आहे. आपल्या होर्डींग्जवर आपण केलेली कामे दाखवली आहेत. 2002,2007,2012 आणि 2017 आणि आताही आपण केलेल्या कामांवर ही निवडणूक लढवत आहोत. शब्द ठाकरेंचा मुंबईत आपण काय करणार आहोत, त्यावर आपण बोलत आहोत. मात्र, भाजपच्या होर्डिंग्जवर दोन चेहरे आहेत. ते पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांचे असतील, त्या दोन चेहऱ्यांचे या मुंबईसाठी योगदान आहे. झिरो असे कसे म्हणतात. गिफ्ट सिटी मुंबईतून गुजरातला कोणी पळवून नेली, उद्योगधंदे मुंबईतून कोणी पळवून नेले, हे त्यांचे योगदान आहेच ना? आपल्या सामान्य माणासाला परवडणाऱ्या बेस्टचे खासगीकरण करत कोणी संपवली, हे त्यांचे योगदान आहे, तुम्ही त्यांना मतदान करणार का, हा तुमचा प्रश्न आहे. तुम्ही योग्य तो निर्णय घेऊ शकता. तुम्ही 15 तराखेला जो निर्णय घेणार आहात, तो मुंबईचा, निर्णय 29 शहरांचा असणार आहे आणि महाराष्ट्राचा असणार आहे,असे ते म्हणाले.
या निवडणुकीत एका बाजूला शिवशक्ती म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी राज्यात एकच आहे. जे इतर आहेत, त्या टोळ्या आहेत.आपली शिवशक्ती ही आघाडी ठोस कार्यक्रम घेत पुढे जात आहे. आम्ही हे करून दाखवणारच,हा आपला शब्द आहे. आपला ट्रॅक रेकॉर्ड आहे. आपला एकमेव पक्ष असा आहे, ज्यांनी करून दाखवलेल्या कामांवर आतापर्यंतच्या महापालिकेच्या निवडणुका जिंकल्या आहेत. आपला वचननाम्याच्या वचनपूर्तीवर जिंकल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्या भाषणात नाशिकचा उल्लेख येतो, तेव्हा नाशिकबाबतचे त्यांचे प्रमे दिसते. 2012 ते 2017 या काळात त्यांनी स्वतः लक्ष घालून प्रेमाने, अभिमानाने नाशिकचा विकास केला आहे. असे दोन भाऊ मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी एकत्र आले आहेत. मात्र, भाजपने नेहमी लूटच केली आहे. ते सात वर्षे मुख्यमंत्री आहेत. 10 वर्षे ते गृहमंत्री होते. मात्र, बांग्लादेशींना ओळखणे आणि बाहेर काढणे, ही त्यांची जबाबदारी होती, मात्र, ते त्यांना जमले नसेल तर त्यांनी आपली चूक कबूल करावी. मुख्यमंत्री पंतप्रधानांवर टीका करत असतील ज्यांची केंद्रात 12 वर्षे सत्ता आहे. मात्र, बांग्लादेशींना ओळखणे आणि बाहेर काढणे हे काम केंद्र आणि राज्य सरकारचे आहे. मात्र, आता तुम्ही त्यांच्या फसव्या आश्वासनांवर जाऊ नका, कारण ही निवडणूक गटार, वॉटर, मीटर यांची आहे, ही आपल्या गल्लीची मुंबई महापालिकेची निवडणूक आहे, याची आठवण त्यांनी करून दिली.
मुंबई महापालिका आपण म्हणतो, तेव्हा आपण करून दाखवलेली कामे आहेत, ती सर्व तुमच्यासमोर आहेत. आम्ही 25 वर्षात काय केले, ते आपण अभिमानाने सांगू शकतो. 1997 मध्ये आपली पहिल्यांदा सत्ता आली तेव्हा 600 कोटींची तूट होती. ती आपण कोणताही छुपा कर, टोल न लावता आपण ती तूट भरून काढली आणि 92 कोटींच्या ठेवी तयार केल्या. हे आपले आर्थिक नियोजन आहे. या ठेवी आपण मुंबईकरांच्या सेवेसाठी वापरल्या आहेत. ते आपण करून दाखवले आहे. आपण आरोग्य सेवेसाठी काम केले आहे. जगात कोठेही नसेल अशी आरोग्यसेवा मुंबई महापालिकेकडे आहे. प्रथामिक आरोग्य केंद्र, रुग्णालय, ट्रामा केअर सेंटर यासाह चार वैद्यकीय महाविद्यालये आपल्याकडे आहेत. याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, ही आम्ही केले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.
शिक्षणातही आपण महत्त्वाचे काम केले आहे. 1235 शाळांमध्ये 8 माध्यमांतून आपण सव्वातीन लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देतो. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना टॅब दिले. डिजिटल, वर्चुअल क्लासरुम आणले. विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा आणली. मराठी अनिवार्य केले. तसेच एसएससी बोर्डासोबत आयजीसीएससी, आयबी, सीबीएससी बोर्ड आणले. तसेच ज्या शाळांची संख्या रोडावत जात होती. त्या शाळांसाठी आपल्याला लॉटरी काढावी लागली.
पाणीपुरवठा क्षेत्रातही आपण काम केले आहे. आपले धरण आहे, मिडल वैतरणा धरण आपल्या काळात झाले आहे. डिसॅलरेशनचा प्लॅन आपण सुरू केला. मात्र, मिंध्यांनी तो बंद केला. आपले महापौर बसतील तेव्हा पुन्हा हा प्रकल्प आपण सुरू करून 400 मिलीयन लिटर पाणी आपण शहरासाठी सुरू करू. बेस्टचे तिकीट आपल्या काळात 5 रुपये होते. प्रत्येक किमीसाठी 1 रुपया लागत होता. आता तिप्पच भाडेवाढ करण्यात आली आहे. आपल्या काळात 35 लाख प्रवासी प्रवास करत होते. आता बेस्टची संख्याही त्यांनी कमी केली तसेच आता प्रवासी संख्याही कमी झाली आहे.
मुंबईकरांच्या ठेवीतून आपण एसटीपी सुरू केले होते. केंद्राने किंवा भाजपने याचे पैसे दिले नाहीत. ते आपले काम आहे. तसेच कोस्टल रोडही आपण केला आहे. त्यांनी जिओ टेक्निकल सर्वेचे फोटो दाखवले आणि पुरावा दिला. आम्ही हे काम करून दाखवले आहे. त्यानंतर त्यांनी भूमीपूजनाचा फोटो दाखवला. त्यात फडणवीस दिसत आहेत का, ते दिसत असतील तर मी त्यांना तीन हजार रुपये देतो, असा टोलाही त्यांनी लगावला. टनेल मशीन आपण आणले, त्याला आपण मावळा हे नाव दिले होते. ही कामे आम्ही केले, हे आम्ही अभिमानाने सांगत आहोत.
भाजपची महाराष्टद्वेष्टी विचारसरणी आहे. महाराष्ट्रविरोधी वृत्ती आहे. अण्णामलाई यांचे त्यांच्या मतदारसंघात डिपॉझिट जप्त झाले आहे आणि ते आपल्याला सांगत आहेत, की मुंबई कोणाची आणि काय आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. कोरोनाच्या काळात आपण मुंबई आणि महाराष्ट्र कसा हाताळला, हे जगाने पाहिले आहे, असेही ते म्हणाले. बीडीडी चाळीचे कामही आपण केले आहे. तेथील प्रत्येकाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानले आहेत. तसेच आता गिरणी कामागारांपासून सरकारी कर्मचाऱ्यांनाही मुंबईत परवडणारी घरे आपण देणार आहोत. आता उद्धवसाहेब, यांच्यासोबत राज ठाकरे यांची ताकद आली आहे ,तसेच पवार साहेब यांचे आशीर्वादही आहेत. त्यामुळे आपण दिल्लीचे तख्त हलवू शकतो, हा विश्वास आपल्याला आहे. आपण जिंकण्यासाठी तयार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



























































