प्रवाशाच्या विचित्र वर्तनाने अमेरिकेत विमानाचे आपत्कालीन लँडिंग, वाचा नेमकं काय घडलं?

अमेरिकेतील सन कंट्री एअरलाइन्सच्या विमानाचे हवेतच आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानात बसलेल्या एका प्रवाशाने विमानात गोंधळ घातला. हे विमान मिनियापोलिसहून न्यू जर्सीच्या नेवार्कला जात होते, परंतु एका प्रवाशाच्या वागण्यामुळे त्याला शिकागोच्या ओ’हेअर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवावे लागले.

न्यू यॉर्क पोस्टनुसार, एका प्रवाशाने भर विमानात ओरडून सांगितले की “समलिंगी लोकांमुळे त्याला कर्करोगाची लागण लागत आहे.” या संबंधित प्रवाश्याने १५ फेस मास्क घातले होते आणि अचानक ओरडू लागला की विमान खाली जात आहे आणि ट्रम्प येथे आहेत. त्याच्या शेजारी बसलेला प्रवासी सेथ इव्हान्स म्हणाला की, तो माणूस निरर्थक बोलत होता. केवळ इतकेच नाही तर हा निरर्थक बडबडणारा व्यक्ती मध्येच त्याच्या मोबाईलवर व्हिडिओ गेम देखील खेळत होता. फ्लाइट क्रू आणि प्रवाशांनी परिस्थिती नियंत्रित करण्यात यश मिळवले आणि विमान सुरक्षितपणे उतरले.

शिकागो पोलिसांनी विमान उतरताच त्या माणसाला ताब्यात घेतले. या घटनेनंतर यूएस मार्शलने इतर प्रवाशांचीही चौकशी केली. सन कंट्री एअरलाइन्सने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “विमान सुरक्षितपणे उतरले आणि संबंधित प्रवाशाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. प्रवाशांच्या संयमाचे आम्ही कौतुक करतो.”

विमान कंपनीने असेही स्पष्ट केले की विमानात कोणतीही तांत्रिक समस्या नव्हती आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने माफी मागितली आहे.