मोदकांचे ताट, प्रसादाचा थाट

‘मंगलमूर्ती मोरया’चा गजर एव्हाना रस्तोरस्ती, घरोघरी ऐकू यायला लागलाय. रोषणाई, देखावे, मखर यांसाङ्गी धावपळ, त्याच वेळी पूजा साहित्य, प्रसादाच्या तयारीसाङ्गीही लगबग पाहायला मिळतेय. प्रसादामध्ये अर्थातच सर्वाधिक पसंती दिली जाते ती मोदकांना. त्यात हे मोदक जर उकडीचे असतील तर त्याची गोडीच न्यारी. हेच उकडीचे मोदक बनवण्यात निपुण असलेल्या श्वेता साटम.

अंधेरीत राहणारी श्वेता साटम गणपतीच्या दहा दिवसांत तर अडीचशे-तीनशे मोदकांच्या ऑर्डर्स घेतेच. शिवाय या वर्षी अधिक महिना आल्याने आधीपासूनच त्यांच्याकडे मोदकांच्या ऑर्डर्स होत्या. पहाटे पाचला उठून त्यांचे मिशन मोदक सुरू होते. सत्यनारायण पूजा किंवा घरातील एखाद्या कार्यक्रमाचे निमित्त असो, जी मंडळी उकडीच्या मोदकांना पसंती देतात त्यांच्या ऑर्डर्स पूर्ण करण्यासाठी श्वेता दिवसभर मेहनत घेतात. कृत्रिम फ्लेव्हर न वापरता गूळ, खोबरे, जायफळ, वेलची हे मोदकांसाठीचे त्यांचे प्रमुख घटक. त्यातही गुळाबद्दल बोलायचे झाल्यास मी फक्त सेंद्रिय गुळाचा वापर करते, असे त्या आवर्जून सांगतात. खोबरे खवल्यावरही केवळ पांढऱ्या खोबऱ्याचाच वापर या पाककृतीसाठी केला जातो. ब्राऊन रंगाचे खोबरे मी माझ्याकडे येणाऱ्या दोन मदतनीस महिलांना अन्य पदार्थांमध्ये वापरण्यासाठी देऊन टाकते. ते खोबरे आपण मोदकांमध्ये कधीही वापरत नाही. दर्जाशी आणि चवीशी मी कुठलीही तडजोड करत नाही. या मोदकांच्या ऑर्डर्स देताना मी सेवाभावी वृत्तीही जपण्याचा प्रयत्न करते. पैसे मिळत राहतीलच, पण त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद मला मोलाचा आहे, असे त्या सांगतात. म्हणजेच उदाहरणार्थ एखाद्या आजी-आजोबांना अगदी दोनच मोदक हवे आहेत किंवा एकत्र राहणाऱ्या दोन वयोवृद्ध बहिणी आहेत त्यांनाही दोन किंवा चार मोदक हवे आहेत तर तीही ऑर्डर मी पूर्ण करते. या व्यवसायात स्वतः चार पैसे मिळवताना आपण इतरांनाही कसे पैसे मिळवून देऊ शकू, हाही विचार माझ्या मनात असतो. म्हणूनच वसईहून येणाऱ्या शोभा भाजीवालीकडून केळीची पाने घेणे असेल किंवा मग सतीशच्या स्टॉलवरून नारळांची खरेदी करणे असेल, हे मी नित्य नियमाने करते.

या सर्व कामात मला माझ्या कुटुंबाची छान साथ मिळते. माझे पती जे पोलीस आहेत, ते मला मेहनत करताना तब्येतीची काळजी घेण्यासाठी आवर्जून सांगत असतात. तसेच माझा मुलगा श्रीरंग मोदकांची ऑर्डर्स पोहोचवण्यासाठी आणि मुलगी सारिकाही या मोदकांच्या कामात मला खूप मदत करते. झेप संस्थेच्या पूर्णिमा शिरीषकर यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन मला या मोदकांच्या व्यवसायात लाभलेय.

वैविध्यपूर्ण मोदक
उकडीच्या मोदकांमध्येही वैविध्य आणण्याचा प्रयत्न मी नेहमी केलाय. ज्यात व्हॅनिला मोदक आणि ड्रायफूट मोदकही मी करून पाहिलेत. त्याला उत्तम पसंती मिळालीय, तर गुलकंद मोदकांची व्हरायटीदेखील ट्राय करण्याचा माझा मानस आहे. याशिवाय परदेशातील मंडळींसाठी फ्रोजन मोदकही एक्सपोर्ट करण्याचे माझे स्वप्न आहे, असे श्वेता यांनी सांगितले.

>> अश्विन बापट
(लेखक एबीपी माझाचे सीनिअर प्रोडय़ूसर-सीनिअर न्यूज अँकर आहेत.)