
सामना प्रतिनिधी, मुंबई
पैशांच्या देवाणघेवाणीवरून एका शेअर दलालास धमकावण्यासाठी गुंडांकरवी गोळीबार केल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर जामिनावर बाहेर आल्यापासून गेली 18 वर्षे पोलिसांना गुंगारा देत लपणाऱ्या आरोपीला अखेर जुहू पोलिसांनी शोधून काढले आहे. गोरेगाव येथे तो नाव बदलून राहत होता.
संदीप भास्कर पवार असे त्या आरोपीचे नाव आहे. 1996 साली संदीपने भावेश देसाई या शेअर दलालास 1 लाख 20 हजारचे शेअर्स विकले होते. तेव्हा या शेअर्सचे पैसे समीर देसाई हा शेअर दलाल देईल असे भावेशने सांगितले होते. पण दोघांनी पैसे दिले नाहीत. त्यामुळे संतापलेल्या संदीपने सत्तार सय्यद आणि मोहम्मद नफिस शेख या धारावीतील दोघा गुंडांना हाताशी धरून जुहू येथे भावेशला गाठले तेव्हा आरोपीने हवेत गोळीबार करून भावेशला घाबरवले होते. त्यावेळी जुहू पोलिसांनी संदीप पवारला पकडले होते. पण जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पुन्हा तारखेला कोर्टात हजर राहिलाच नाही.
त्याच्या विरोधात समन्स, वॉरण्ट काढले, पण तो समोर येत नव्हता. अखेर जुहूचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली तडीपार अधिकारी अजय भोसले तसेच प्रकाश सावंत, दीपक तंबाके, आनंद गायकवाड, संतोष देसाई, हिरॉईन भोई या पथकाने गोरेगावमध्ये नाव बदलून राहणाऱया संदीपला शोधून काढले. तब्बल 18 वर्षांनंतर फरारी आरोपी पोलिसांच्या हाती लागला.
summary- a thug got arrested after 18 years
























































