यूट्यूब चॅनेलसाठी विमानात खेळली लपाछुपी; मैत्रीणीसह महिला विमानातून ‘आऊट’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मिडीयावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणतेही स्टंट करण्याची चढाओढ लागलेली दिसून येते. तसेच यूट्यूब चॅनेल लोकप्रिय करण्यासाठी आणि चॅनेलला जास्त लाइक मिळवण्यासाठी एका महिलेने केलेला कारनामा तिच्या अंगलट आला आहे. यूट्यूब चॅनेलसाठी काहीतरी वेगळे करण्याच्या हेतूने अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात एक महिला आपल्या मैत्रीणीच्या बिजनेस क्लासच्या आसनाखाली लपली. त्यामुळे विमानात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर त्या महिलेला आणि तिच्या मैत्रीणाला विमानातून उतरवल्यानंतर विमानाने उड्डाण केले.

अमेरिकन एअरलाइन्सचे फ्लाइट एए 2205 डालास फोर्ट वर्थ हून मियामीकडे जात होते. त्यावेळी अचानक एक महिला आपल्या जागेहून उठली आणि बिजनेस क्लासमध्ये असलेल्या आपल्या मैत्रीणीच्या आसनाखाली लपली. हे फ्लाइट प्रवाशांनी भरलेले होते. त्यामुळे या महिलेचे आसन रिकामे असून त्या जागेवर फक्त पर्स ठेवल्याचे फ्लाईट कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.

फ्लाईट कर्मचाऱ्यांनी शेजारच्या प्रवाशांकडे विचारणा केली, तेव्हा एक महिला या जागेवर होती. थोड्यावेळापूर्वी ती या जागेवर पर्स ठेवून निघून गेल्याचे शेजारच्या प्रवाशांनी सांगितले. मात्र, ती कुठे गेली ते माहित नसल्याचे ते म्हणाले. ती महिला आपल्या जागा सोडून बिजनेस क्लासमध्ये असलेल्या आपल्या मैत्रीणीच्या आसनाखाली लपली होती. मैत्रीणीला घाबरवून या ‘थ्रिल’च्या आधारे यूट्यूब चॅनेलच्या लाइक्स वाढवण्याचा तिचा हेतू होता.

एक प्रवासी आपल्या जागेवर नसल्याने फ्लाईट कर्मचाऱ्यांनी याबाबतची उद्घोषणा केली. जागेवर नसलेला प्रवासी जागेवर येत नाही, तोपर्यंत विमान उड्डाण करणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. या उद्घोषणनंतर महिला आपल्या जागेवर येण्यासाठी निघाली. मात्र, सतर्क असलेल्या केबिन क्रूने तिला पकडले. महिलेकडे जागा सोडण्याबाबत विचारणा केली असता आपण काहीही अयोग्य केले नसल्याचे तिने सांगितले.

आपली काहीही चूक नसताना आपल्याला दोषी ठरवत फ्लाईटमधील प्रवासी अपमान करत असल्याचे महिला म्हणाली. आपण तिकीटासाठीचे पैसे भरले आहेत. त्यामुळे आपल्याला अशी वागणूक देणे योग्य नसल्याचेही ती म्हणाली. घरी लहान मूल एकटे असून आपल्याला लवकर घरी जायचे आहे, असेही तिने सांगितले. मात्र, फ्लाईट कर्माचाऱ्यांनी तिचे काहीही ऐकले नाही. या महिलेला आणि तिच्या मैत्रीणीला विमानातून उतरवल्यानंतर नियोजित वेळेच्या तीन तासानंतर विमानाने उड्डाण केले. यूट्यूब चॅनेलसाठी केलेला कारनाम्यासाठी महिलेला आणि तिच्या मैत्रीणीला मोठी किंमत चुकवावी लागली आहे.