वरळीत आज ‘आदित्य संवाद’; तरुणांच्या प्रश्नांना देणार मनमोकळी उत्तरे

सामना ऑनलाईन । मुंबई

तरुणाईच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे देण्यासाठी तसेच तरुणांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवार, 22 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता वरळीतील एनएससीआय डोममध्ये ‘आदित्य संवाद’ कार्यक्रमातून मुंबईच्या युवक-युवतींशी संवाद साधणार आहेत. शहरात तसेच सोशल मीडियावर कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे.

या कार्यक्रमाला या आधी संभाजीनगर, कोल्हापूर आणि नाशिक या प्रमुख शहरांत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात ते सुमारे सहा लाख युवकांशी थेट तर 15 लाख युवकांशी डिजिटल माध्यमातून संवाद साधणार आहेत.

हा कार्यक्रम 18 ते 35 वयोगटातील उपस्थित मुंबईकरांसाठी खुला आहे. युवकांनी मीडियाच्या माध्यमातून या कार्यक्रमाची मोठय़ा प्रमाणात नोंदणी केली असून कार्यक्रमाला इच्छुक तरुण www.adityasanvad.com या संकेतस्थळावर नोंदणी करून कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात. या कार्यक्रमासाठी 20 हजार युवकांची नोंदणी झाली आहे. जास्तीत जास्त युवकांनी ‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांवर त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधावा, असे आवाहन मुंबई युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या