लसींची उपलब्धता पाहूनच केंद्रांवर जा! आदित्य ठाकरे यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर किती लसी उपलब्ध आहेत याची माहिती ट्विटरवर घेऊनच लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रांवर जावे, असे आवाहन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केले. नगरसेविका सान्वी तांडेल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या चुनाभट्टी येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह येथील लसीकरण केंद्राचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइनरीत्या आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी ते बोलत होते.

पर्यटन-पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे पुढे मार्गदर्शन करताना म्हणाले की,  सुरुवातीला लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये असलेली भीती कमी झाली असून आता अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. लसीकरण केंद्रावर आल्यानंतरसुद्धा नागरिकांनी आपल्या चेहऱयावर मास्क ठेवलाच पाहिजे. त्यासोबतच प्रत्येक वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरू झाली पाहिजे. लसीकरण केंद्रासाठी नगरसेवकांमध्ये हेल्दी स्पर्धा असली तरी चालेल. जेणेकरून जास्तीत जास्त लसीकरण केंद्र तयार होतील. याप्रसंगी आमदार संजय पोतनीस, आमदार मंगेश कुडाळकर, माजी नगरसेवक विजय तांडेल, एल विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष वाळुंज व संबंधित वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

ड्राईव्ह इन लसीकरण केंद्राचे लोकार्पण

लोअर परेलच्या सेनापती बापट मार्गावरील द वर्ल्ड टॉवरमधील पालिकेच्या वाहनतळाच्या जागेत 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी आणि 45 वर्षांच्या पुढील नागरिकांसाठी ‘ड्राईव्ह इन’ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्राचे तसेच पवईच्या पवई उद्यान शाळेत सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचे लोकार्पण महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खासदार अरविंद सावंत, माजी आमदार सचिन अहिर, जी / दक्षिण विभागाचे  प्रभाग समिती अध्यक्ष दत्ता नरवणकर, नगरसेवक अॅड. संतोष खरात,  नगरसेविका चंद्रावती मोरे, उपायुक्त विजय बालमवार, सहाय्यक आयुक्त शरद उघडे उपस्थित होते.