निवडणूक आयोगाने राहुल गांधींसोबत एका स्टेजवर उभं राहून त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यावी, आदित्य ठाकरे यांचे आव्हान

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यांसह निवडणूक आयोगाची पोलखोल केली. मतदार यादीतील अनियमितता आणि घोळ त्यांनी पुराव्यांसह मांडत मतचोरी कशी झाली ते स्पष्ट केले. महाराष्ट्रासह देशभरात मतचोरी सुरू असल्याचे त्यांनी दाखवून दिले. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला एक आव्हान केले आहे. ”राहुल गांधींनी अगदी लॉजिकली, पुराव्यानिशी निवडणूक आयोगाची पोलखोल केली आहे. आता आयोगाने राहुल गांधींसोबत एका स्टेजवर उभं राहून त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यावी”, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

”’तुम्ही कोणत्याही विचारसरणीचे असलात तरी जर तुम्ही देशभक्त असाल तर राहुल गांधींचा निवडणूक आयोगाचा पर्दाफाश करणारा व्हिडीओ पाहाच. आम्ही खूप आधीपासून सांगत आलोय की इलेक्शन कमिशनने गेल्या काही वर्षात देशात निष्पक्ष: व मुक्त निवडणूका घेतलेल्या नाहीत. आपल्या देशात लोकशाही असल्याचे आपण भासवतो पण प्रत्यक्षात तसं दिसत नाही. राहुल गांधी यांनी आज मुद्देसूद मांडणी करत पुरावे सादर करत पूर्ण पारदर्शकतेने निवडणूक आयोगाचा पर्दाफाश केला आहे. आता निवडणूक आयोगाने राहुल गांधींसोबत एका स्टेजवर उभं राहून त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यावी. किंवा मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने (ECI) त्यांचे नाव एंटायरली कॉम्प्रमाईज्ड कमिशन असे ठेवावे. हा सर्व प्रकार फक्त निवडणूकांसाठी नाही तर हे सर्व देशासाठी आहे”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

राहुल गांधी यांनी पीपीटी सादरीकरण करत मतचोरीचे अनेक पुरावे दिले. तसेच महाराष्ट्र निवडणूकीत मत चोरी झाल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रात आपण निवडणूक हरलो. महाराष्ट्रात 40 लाख अतिरिक्त मतदार आहेत. पाच महिन्यांत येथे बरेच मतदार मतदारयादीत घुसडण्यात आले. अनेकांची घर क्रमांक शून्य आहे. अनेकांची नावे, वडिलांचे नाव, आडनाव यात घोळ आहे. तसेच नव मतदारांसाठी असलेल्या फॉर्म 6 चा गैरवापर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नव मतदारांऐवजी 45 ते 95 वय असलेल्यांच्या नावाचाही यात समावेश आहे. निवडणूक आयोगाने मतदार यादीबद्दल उत्तर द्यावे. मतदार यादी बरोबर आहे की चूक हे त्यांनी सांगावे? असे आव्हानही राहुल गांधी यांनी दिले.