आमदार फोडताना जसे पॅकेज दिले जातात, त्याहून चांगलं पॅकेज शेतकऱ्यांच्या मदतीसाठी द्या – आदित्य ठाकरे

‘भ्रष्टाचारत आपल्या राज्याचा पहिला नंबर आलाय. एका बाजूला राज्यात भ्रष्ट्राचार वाढला आहे दुसऱ्या बाजूला सरकारकडे लाडकी बहिण, आनंदाचा शिधा, कर्जमाफीसाठी पैसे नाही. माझी या सरकारकडे एकच मागणी आहे की आमदार फोडताना जसे पॅकेज दिले जातात, त्याहून चांगलं पॅकेज शेतकऱ्यांच्या मदतीसाठी द्या”, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारला सुनावले आहे.

”आम्हाला हिच अपेक्षा आह की महाराष्ट्रात जे नुकसान झालंय शेतकऱ्यांचं त्यासाठी पन्नास हजार प्रती हेक्टर, कर्जमाफी, लाडकी बहिणी योजनेची सहा महिन्यांची एक रकमी रक्कम महिलांच्या खात्यात गेली पाहिजे. आम्हाला आशा आहे की प्रधानमंत्री महोदय, राज्य सरकार ही पूर्ण करेल अशी आशा आहे.

आनंदाचा शिधा ही योजना बंद होणार आहे याबाबत पत्रकारांनी विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, ”कधी ठाणे, भाईंदर महापालिकेतील अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक होतेय पण त्या भ्रष्टाचारमागे कुणी मंत्री आहे, राजकीय व्यक्ती आहे का याचा तपास होत नाहीये. भ्रष्टाचारात आपल्या राज्याचा पहिला नंबर आलाय. आपलं दुर्दैव आहे की निवडणूक आयोगाने एक भ्रष्टाचारी सरकार आपल्या डोक्यावर बसवलं आहे. दुसऱ्या बाजूला लाडकी बहिण, आनंदाचा शिधा, कर्जमाफी, चांगल्या काम करणाऱ्या कॉ़न्ट्रॅक्टरना त्यांचे पैसे मिळत नाही. आमदार फोडताना जसे पॅकेज दिले जातात. तसं त्याहून चांगलं पॅकेज शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिलं तर चांगलं होईल”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.