
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचे कोळीवाड्यात मोठ्या उत्साहात स्वागत झाले. नारळी पौर्णिमेच्या मिरवणुकीत आदित्य ठाकरे सहभागी झाले. यावेळी कोळीबांधवांनी आदित्य ठाकरे यांना पारंपरिक कोळी टोपी घातली आणि स्वागत केले. आदित्य ठाकरे यांनी मिरवणुकीदरम्यान कोळीबांधवांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी अतिशय उत्साहाचे आणि आनंदायी असे वातावरण होते. वरळी समुद्र किनाऱ्यावर आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नारळी पौर्णिमेचे पूजनही करण्यात आले.
थिएटरमध्ये तुम्ही पहिल्या रांगेत बसता की शेवटच्या रांगेत बसता? स्क्रिनच्या जवळ किती बसायचं आणि घरगुती वातावरणात असताना कुठल्या रांगेत बसायचं? हा आमचा निर्णय आहे. त्यांना झोंबलंय काय? आम्ही कुठे बसलो ते नाही. त्यांना झोंबलं हेच आहे की, त्यांचं जे निवडणूक आयोग त्यांच्या ऑफिसमधून चालतं त्याला काल राहुल गांधी यांनी एक्स्पोज केलेलं आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी यावेळी टीका करणाऱ्यांना लगावला.
आम्ही इथे जेट्टीसाठी फंड मागितला आहे. तो अजून आला नाही. परवा आम्ही इथल्या आणि ससून डॉक येथील कोळीबांधवांसाठी केंद्रीय मंत्री सोनोवाल यांची भेट घेतली. कोळीबांधवांना हैराण केलं जातंय. महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून (MFDC) हैराण केलं जातंय. ही सगळी संकटं दूर व्हावीत हीच इच्छा आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
ते मिंधे गटातले लोकं, चोर गट आहे तो. पक्ष चोरला, पक्षाचं चिन्ह चोरलं. त्यांना फॅसिनेशन आमच्याबद्दलच आहे. उद्या आश्चर्य वाटून घेऊ नका जर आमचा मास्क घालून ते फिरायला लागले तर. स्वतःचं काही कर्तव्य नाही, आतापर्यंत सगळं जे काही मिळालं आहे ते उद्धवसाहेबांनी दिलेलं आहे. तिकीट असेल, राजकीय ओळख असेल, सामाजिक ओळख असेल. नंतर आता भाजपचे गुलाम म्हणून जगताहेत. ज्यांच्या स्वतःच कर्तृत्व नाही, काही कर्तव्य नाही त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. असे अनेक लोक आजूबाजूने जातात, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असा जोरदार टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.