
आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणता, मग आज भाजपाने काय केलं? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आजच्या शपथविधीबद्दल केला आहे. तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे! ’स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी’, अशी ही लढाई असणार आहे!, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्वाचे प्रश्न…असे नमूद करत आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर पुढीलप्रमाणेच चार प्रश्न उपस्थित केले आहेत.
- मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना 1 वर्ष उलटल्यावरही काय मिळालं??
- रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो… जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी??
- एक गद्दार आज टीव्हीवर म्हणाले, ‘145 जागा जिंकायच्या असतील तर ह्यांना सोबत घ्या’, असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे हे सिद्ध झालंय की मिंधेंकडे क्षमताच नाही! नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला??
- आणि सर्वात महत्वाचं… आम्ही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, असं म्हटलं गेलं. मग आज भाजपाने काय केलं?? तेही सत्तेसाठी आकडय़ांची गरज नसताना!
























































