
शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण शहरातील घरावर मंगळवारी रात्री हल्ला झाला होता. या प्रकाराबाबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांचे संरक्षण काढून घेतल्यानंतर काही वेळातच हा हल्ला झाला होता. त्यामुळे या हल्ल्यामागे कोणाचे राजकीय पाठबळ आहे का हे शोधून काढले पाहिजे असे आदित्य ठाकरे म्हणाले. यासाठी भास्कर जाधवांच्या घरावर हल्ला करणारे कोण आहेत हे शोधून काढण्यासाठी चौकशी केली जावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरासमोरील अंगणात क्रिकेटमधील स्टंप, पेट्रोलच्या बॉटल्स व दगड आढळले होते. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले की, मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास भास्कर जाधव यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले. याच्या 1-2 तासानंतर हा हल्ला झाला आहे. या हल्ल्याला राजकीय पाठबळ आहे का ? कोणती यंत्रणा यामागे आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे.”
पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे शहर तुंबलं होतं. मुंबईत थोडं जरी पाणी साचलं तरी टीका करणाऱ्या भाजपला या निमित्ताने आदित्य ठाकरे यांनी चांगलेच टोले लगावले. आदित्य ठाकरे म्हणाले की “आता सांगितलं जातंय की राजकारण आणू नका. मात्र पुणे-बंगळुरूमध्ये 5 वर्ष सत्तेत कोण होतं ? यावर प्रश्न विचारलं तर म्हणतात राजकारण आणू नका. पण मुंबई कधी पावसामुळे तुंबली तर ते म्हणतात शिवसेनेची सत्ता आहे. गेल्या 5 वर्षात पुण्यात जी विकासकामे झाली आहे किंवा जे घोटाळे झाले आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे. मी नवरात्रीत पुण्यात असताना 15 मिनिटे पाऊस झाला तर पाणी तुंबले, झाडे पडली. यापूर्वी असं कधी झालं नव्हतं. याची चौकशी झाली पाहिजे. दोष देण्यासाठी नाही तर असं नेमकं का झालं ? आपण काही सुधारणा करू शकतो का हे पाहण्यासाठी ती झाली पाहिजे. “





























































