
जिथे हिंदु मुस्लीम चालत नाही तिथे भाजप भाषिक वाद घालतं आणि भाषेचेही वाद नाही चालले तर जातीत विष पेरतं अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच भाजपने प्रामाणिकपणे निवडणूक लढवल्यास त्यांची एकही जागा येणार नाही, असा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपजेपी व निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, परळ मतदारसंघातील शाखांनी घेतलेल्या यादीत 14 नोव्हेंबरची तारीख आढळली, तर प्रारूप यादी प्रत्यक्षात 20 नोव्हेंबरला प्रकाशित झाली. मग 14 नोव्हेंबरची यादी कोणाच्या हातात होती? आधीच यादी छापली असेल तर कोणाला मदत करण्यासाठी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजपच्या आदेशासाठी थांबलात की मिंधेंच्या आदेशासाठी? याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे, बीजेपीने नाही. मतदार यादीत लाखो दुबार नावे असून अनेक ठिकाणी प्रत्येक घरात 10 पेक्षा जास्त बनावट नोंदी सापडल्या आहेत. हा स्कॅम आम्ही लोकांसमोर आणणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
आदित्य ठाकरे यांनी इशारा दिला की “उत्तर न मिळाल्यास रस्त्यावर उतरून उत्तर देऊ. पुढील चार दिवस यादी दुरुस्तीची मुदत वाढवलीच पाहिजे.
पालघर साधू हत्याकांडातील आरोपी काशिनाथ चौधरी यांना पक्षात घेतल्याच्या मुद्यावरून त्यांनी भाजपवर टीका केली.
या घटनेतून दाखवले की भाजपचे हिंदुत्व पोकळ आहे. आरोप गंभीर नसतील तर स्थगिती का दिली? आणि असतील तर पक्षात घेतले कशाला? आता मराठी-अमराठी आणि धर्मवादाचे राजकारण करून फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.मुंबई अशा घाणेरड्या खेळांना उत्तर देईल. इथे ते चालत नाही.
आदित्य ठाकरे यांनी आरोप केला की निवडणूक आयोगात स्वतःचे लोक बसवून, पैसे वाटून आणि वोट चोरी करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. मुक्तपणे निवडणूक झाल्यास त्यांना एकही सीट मिळणार नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

























































