
दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त, सुजलाम, सुफलाम, हिरवागार, भगवा, सुरक्षित, सुशिक्षित महाराष्ट्र आपल्याला घडवायचा असून शिवशाही आणायची आहे. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. लोकसभेनंतर ज्यांनी शिवसेनेला मतदान केले त्या जनतेचे, शिवसैनिकांचे तसेच अज्ञात हातांचेही मला आभार मानून आशीर्वाद घ्यायचे आहेत. यासाठी ही जन आशीर्वाद यात्रा राज्यभर काढली असल्याचे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले.
जन आशीर्वाद यात्रेचा चौथा टप्पा रायगडात सुरू झाला असून आज अलिबाग येथे क्षात्रौक्य समाज हॉलमध्ये विजयी संकल्प सभेचे आयोजन शिवसेनेतर्फे करण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी जमलेल्या शिवसैनिकासमोर आपले विचार व्यक्त केले. खासदार श्रीकांत शिंदे, माजी आमदार सचिन अहिर, संपर्कप्रमुख विलास चावरी, जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, सह संपर्कप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, माजी जिल्हाप्रमुख किशोर जैन, तालुका प्रमुख राजा केणी, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते.
जन आशीर्वाद यात्रा ही निवडणुकीची यात्रा नसून लोकसभेत ज्या ज्या मतदारांनी शिवसेनेला मतदान केले, प्रचार केला तसेच अज्ञात हातांनी मतदान केले. ज्यांनी मतदान केले नाही अशा सर्वांचे आभार मानून आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे. शिवशाही राज्यात आणण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणातून केले आहे.
समाजातील जातीपातीचे भेदभाव, धर्माचे भेदभाव, राजकीय विचारसरणीचे भेदभाव बाजूला ठेऊन आपल्याला एकसाथ नव्या विचारसरणीचा महाराष्ट्र घडवायचा आहे. यासाठी मला तुमची साथ हवी आहे. आज यात्रेनिमित्त फिरताना अनेक ठिकाणी ओवाळणी केली जाते, हार घातले जातात पण त्याचबरोबर जनता आपल्या समस्येचे निवेदन ही मला देत आहेत. मला आपला माणूस मानत असल्याने त्यांच्या समस्येचे निवेदन मला देत आहे. त्यामुळे आता माझी जबाबदारी वाढली असल्याचे आदित्य ठाकरे यांनी भाषणात म्हटले.




























































