आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर; पिंगुळीत घेतले श्री गणरायाचे दर्शन!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरूवारी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील शिवसैनिक महेश पालकर आणि नितीन दळवी यांच्या निवासस्थानी भेट देत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी आदित्य यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिवसैनिक तसेच ग्रामस्थ आणि बच्चेकंपनीशी आदित्य यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला.

गणेशोत्सवानिमित्त आदित्य ठाकरे गुरूवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांचे जिल्ह्यात शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या आरोंदा येथील तर खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव येथील निवासस्थानी त्यांनी गणारायाचे दर्शन घेतले. त्यांनी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी शेटकरवाडी येथील शिवसैनिक महेश पालकर आणि नितीन दळवी यांच्या निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, सहसंपर्क प्रमुख अतुल रावराणे, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना विधानसभा प्रमुख सुशांत नाईक, युवतीसेना विस्तारक रूची राऊत, गितेश राऊत, सौ. मेघा राऊत, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुका संघटक बबन बोबाटे, विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, सिद्धार्थ धुरी, आदिंसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.