मेट्रो कारशेड नवीन जागेत; आदित्य ठाकरे यांचे सूतोवाच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मेट्रो’ प्रकल्पाची कारशेड दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासाठी अंतिम निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट सूतोवाच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिले आहेत. यामुळे रखडलेल्या कारशेडसाठी नवीन जागा उपलब्ध होऊन कारशेडचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी आशा निर्माण झाली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज उत्तर मुंबईतील विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण करण्यात आले. यावेळी ‘आरे’तील अंतर्गत रस्त्याचे काम पावसाळय़ानंतर सुरू करण्यात येणार असून येथील रुग्णालयही पालिका किंवा शासनच्या ताब्यात देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ‘आरे’तील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीट कामाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. 47 कोटी रुपये खर्च करून 7.2 कि.मी.चा हा रस्ता बनवण्यात येत आहे. 24 महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे. या कामांसाठी आमदार रवींद्र वायकर यांनी पाठपुरावा केला.

आगामी काळात आरे तलाव सुशोभीकरण, आरे गार्डन, मुख्य प्रवेशद्वार, अत्याधुनिक हॉस्पिटलही करण्याचे आश्वासन यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिले. यावेळी आमदार सुनील प्रभू, नगसेविका रेखा रामवंशी, नगरसेवक बाळा नर, प्रवीण शिंदे, साधना माने, अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसू, उपायुक्त विजय बालमवार, आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पवार आदी उपस्थित होते.

…म्हणूनच घोषणा महत्त्वपूर्ण

झाडे वाचवण्यासाठी ‘आरे’तील कारशेडला शिवसेनेने सुरुवातीपासून विरोध केला आहे. त्यामुळे आघाडी सरकार येताच ‘आरे’तील कारशेडला स्थगिती देण्यात आली. यानंतर कारशेडसाठी कांजुरमार्ग येथील जागेची घोषणा करण्यात आली. मात्र या जागेबाबतही अद्याप अनिश्चितता असल्याने आदित्य ठाकरे यांनी कारशेडसाठी दिलेल्या नवीन जागेचे संकेत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

प्राण्यांसाठी कलव्हर्ट

‘आरे’तील रस्ता एकही झाड न तोडता होत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. हे सरकार आपले आहे, मुख्यमंत्री आपले आहेत. त्यामुळे आपल्या मागण्या हक्काने पूर्ण करून घ्यायच्या आहेत. प्राण्यांसाठी रस्त्याच्या खालून कलव्हर्ट बांधण्यात येणार आहे. हा रस्ता रात्री 1 ते सकाळी 6 पर्यंत फक्त आरेतील लोकांसाठी सुरू राहील असेही ते म्हणाले.