सरकारमध्ये मतदान घोटाळा केलेली माणसे बसली आहेत! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

भाजपने निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून महाराष्ट्राच्या निवडणुकीत मते चोरल्याचा प्रकार संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी उघड केल्यामुळे मतदानात घोटाळा केलेली माणसे सरकारमध्ये बसल्याचे स्पष्ट झाल्याचा घणाघात आज शिवसेना नेते – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. ते भाजपचे गुलाम म्हणून जगत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. राहुल गांधींमुळे मतचोरीचा प्रकार देशालाच नाही तर संपूर्ण जगाला कळल्याचेही ते म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी वरळी कोळीवाडा येथे कोळी बांधवांसोबत नारळी पौर्णिमा साजरी केली. यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, राहुल गांधींनी बोगस मतदानाचा पर्दाफाशच केला आहे. बोगस मतदान, एकाच नावावर अनेक मतदार, न जुळणारा पत्ता अशा बाबी त्यांनी निदर्शनास आणून दिल्या. असे घोटाळा केलेली माणसेच सरकारमध्ये बसली आहेत. यावेळी शिवसेना आमदार सुनील शिंदे, आमदार महेश सावंत, उपनेते आमदार सचिन अहीर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यासह मोठय़ा संख्येने कोळी बांधव उपस्थित होते.

ससून डॉक, कोळी बांधवांचे प्रश्न सोडवणार

ससून डॉक आणि कोळी बांधवांच्या प्रश्नांसाठी आपण केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली आहे. महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंटकडून कोळी बांधवांना हैराण केले जात असल्याचे या वेळी निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी सांगितले.

मिंधे गट हा ‘चोरगट’ आहे. त्यांच्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. त्यांना अजूनही आमचाच मोह आहे. उद्या ते आमच्या चेहऱयाचा मास्क लावून फिरतील. त्यांनी पक्ष चोरला, पक्षचिन्ह चोरले.

कुलाब्याच्या बधवार पार्कमध्ये नारळी पौर्णिमा मोठय़ा जल्लोषात साजरी झाली. कोळी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा करून मिरवणूक काढत समुद्रात नारळ अर्पण केला. लहान मुलांसह महिला-पुरुषही या सोहळय़ात उत्साहाने सहभागी झाले.