वापरा आणि फेका हेच भाजपचे धोरण; चाळीस गद्दारांचेही हेच होणार; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

भारतीय जनता पक्षासोबत कुणीही नव्हते तेव्हा त्या कठीण काळात शिवसेना त्यांच्यासोबत होती. शिवसेनेला वापरून घेतले आणि नंतर युती तोडली. यूज अॅण्ड थ्रो म्हणजे वापरा आणि फेका हेच भाजपचे धोरण आहे. त्यांच्याकडे गेलेल्या 40 गद्दारांचीही तीच अवस्था होणार, असा घणाघात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केला.

यवतमाळ वाशीमचे महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार संजय देशमुख यांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी यवतमाळच्या पोस्टल ग्राऊंडवर झालेल्या सभेमध्ये आदित्य ठाकरे यांनी संबोधित केले. भर उन्हातही या सभेला हजारोंची गर्दी झाली होती. पोहरादेवीच्या परिसरात संत सेवालाल महाराजांच्या भूमीत आपली पहिली सभा होतेय आणि येथील वातावरण पाहिले तर महाविकास आघाडी यवतमाळ वाशिम जिंकणार म्हणजे जिंकणारच, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

भाजपच्या वापरा आणि फेका नीतीवर आदित्य ठाकरे यांनी यावेळी जोरदार प्रहार केला. शिवसेना सोबत राहिल्यामुळे भाजपचे अच्छे दिन आले आणि त्यानंतर देशाचे अच्छे दिन कधी येणार, असे शिवसेनेने विचारल्यानंतर 2014 मध्ये भाजपने युती तोडली. वरून शिवसेनेने धोका दिल्यामुळे युती तोडल्याचा आरोप केला गेला. 2019 मध्येही भाजपने लोकसभेसाठी शिवसेनेला वापरून घेतले, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

2024 मध्ये परिवर्तन घडणार म्हणजे घडणारच

गेल्या दोन-अडीच वर्षांत महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱयात पाहतोय. लोकांना परिवर्तन हवे आहे. देशात आता परिवर्तनाचे वारे वाहायला लागले आहेत. त्याची खात्री मलाही पटली असून परिवर्तन घडणार म्हणजे घडणारच आणि ते घडवण्यात आपला स्वाभिमानी महाराष्ट्र अग्रेसर असेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.

भाजपमुळे जगभरात हिंदुस्थानची बदनामी

मोदी सरकारने भ्रष्टाचाराचे आरोप करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात टाकले. भ्रष्टाचाऱयांविरुद्ध लढणाऱयांनाच मोदी सरकारने तुरुंगात टाकल्याने जगभरात हिंदुस्थानची बदनामी झाली, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

काँग्रेस आणि आप दिल्ली जिंकेल

केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आणि सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना ताकद देण्यासाठी इंडिया आघाडीचा मेळावा नुकताच दिल्लीत झाला. त्यावेळी दिल्लीकर नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ते पाहिले तर दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टी सर्व सात जागा जिंकेल अशी खात्री आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

ईडी, सीबीआय, आयटी हे भाजपचे मित्रपक्ष

भाजपच्या हुकूमशाहीविरुद्ध लढताहेत, भ्रष्टाचाराविरुद्ध लढताहेत म्हणून मोदी सरकारने दोन मुख्यमंत्र्यांना अटक केली असे सांगतानाच, ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स हे भाजपचे मित्रपक्ष बनले आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री अमावास्या-पौर्णिमेला गायब होऊन शेती करायला जातात

परभणीतील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा महायुतीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. मात्र त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर होते. त्याचप्रमाणे ठाण्यातील निवासस्थानी नाराजांनी गर्दी केली तेव्हाही शिंदे गायब होते. त्यावरून अनेक शंका व्यक्त होत आहेत. याबाबत प्रसारमाध्यमांनी आदित्य ठाकरे यांना विचारले असता, मुख्यमंत्री अमावास्या आणि पौर्णिमेला शेती करायला जातात. यापूर्वीही त्यांनी अनेकांना ताटकळत ठेवले होते, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

भाजपला देशात स्वतःचे संविधान लागू करू देणार नाही

भाजपला देशाचे संविधान आवडत नाही. त्यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बाजूला ठेवून स्वतःचे संविधान देशात लागू करायचे आहे. मात्र, शिवसेना असे कदापि करू देणार नाहीत, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, लिंगाडे, वसंत पुरके, वजाहत मिर्झा, सुभाष वानखेडे, कीर्ती गांधी, वामनराव कासावार, ख्वाजा बेग, प्रफुल्ल मानकर, ययाती नाईक, किशोर तिवारी, सुनील धाबेकर, बाळासाहेब मंगरूळकर, प्रवीण देशमुख, विश्वास नांदेकर, बाळासाहेब मुनगीनवार आदी उपस्थित होते.

‘अब की बार… भाजप तडीपार’ नारा घराघरात पोहोचवा

‘अब की बार… भाजप तडीपार’ असा नाराही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला. हा नारा घराघरात पोहोचवा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. या सभेला शेतकरी आणि महिलांची संख्या मोठी होती. पेंद्र सरकारने दिल्लीत आंदोलन करणाऱया शेतकऱयांवर ड्रोनद्वारे अश्रूधूर सोडला. स्वामिनाथन आयोगाचा अहवाल लागू करण्याचे आश्वासन देऊनही शेतकऱयांची फसवणूक केली याची आठवण यावेळी आदित्य ठाकरे यांनी त्यांना करून दिली. गुजरातमध्ये बिल्कीस बानोवर अत्याचार करणाऱया आरोपींचा भाजपकडून सत्कार केला जातो आणि यवतमाळमध्ये महिलांवर अत्याचार करणाऱयाला मिंध्यांनी मंत्रिमंडळात बसवले. महिलांवर अत्याचार करणाऱयांना तुम्ही मते देणार का असे आदित्य ठाकरे यांनी विचारले असता, उपस्थित महिलावर्गाने नकारार्थी घोषणा दिल्या.

गद्दारांना तिकीट दिले तिथे निकाल पलटणार

संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी यवतमाळकडे येताना आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रामटेकच्या कृपाल तुमाने यांच्यासह दोन बंडखोरांना मिंध्यांनी तिकीट नाकारल्याचे माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता, ते बंडखोर नव्हेत तर गद्दार आहेत, असे उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिले. आता अन्य 40 गद्दारांनी, मिंधे खासदारांनीही पुढचा विचार केला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. जिथे जिथे गद्दारांना तिकीट मिळाले आहे तिथे निकाल वेगळा येईल, असे ते म्हणाले.

– शरद पवार यांच्या नावाने मते मागण्याचे दिवस आता संपलेले आहेत, असे वक्तव्य शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले होते. त्याबद्दल माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, आढळराव हे काही दिवसांपूर्वी शिवसेना वाचवायला राष्ट्रवादीविरोधात लढत होते. काही महिन्यांपूर्वी वा काही दिवसांपूर्वी काही लोक काय बोलत होते हे सर्वांना माहीत आहे. कोणी गद्दारी केले हे लोकांसमोर चित्र आता स्पष्ट झाले आहे.

– देशात लोकशाही संपुष्टात येत चाललेली आहे. संविधानाला मोठा धोका निर्माण झाला आहे. अशा काळात आम्ही सगळे एकत्र येऊन लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत आहोत. त्यात प्रकाश आंबेडकरांचाही सहभाग महत्त्वाचा आहे, असे आदित्य ठाकरे यावेळी वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत विचारलेल्या प्रश्नावर म्हणाले.

मिंधे-भाजपात बोली लागल्यामुळे उमेदवार ठरत नाहीत

बहुतांश मतदारसंघांमध्ये इतर पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करूनही महायुतीने अद्याप उमेदवार दिलेले नाहीत. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी यावेळी निशाणा साधला. मिंधे गट आणि भाजपमध्ये उमेदवारांवरून बोली लागली आहे, म्हणूनच त्यांचे उमेदवार ठरत नाहीत असा आरोप त्यांनी केला. यवतमाळ-वाशिममध्ये उमेदवारी अर्ज दाखल करायला 72 तास उरले असतानाही अद्याप महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही; कारण मिंधे आणि भाजपा महाविकास आघाडीच्या ताकदीला घाबरली आहे, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

भाजप, मिंध्यांच्या काळात शेतकऱयांचे हाल – संजय देशमुख

महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी यावेळी बोलताना मिंधे सरकार आणि भाजपच्या शेतकरीविरोधी धोरणांवर टीका केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कापसाला 11 हजार रुपये भाव होता. मिंधे सरकारच्या काळात 11 हजारांचा कापूस 7 हजारांवर आला आणि 6 हजारांचा सोयाबीन 4 हजारांवर आला, असे देशमुख म्हणाले. यवतमाळमध्ये पाणीपुरवठा योजना, नाटय़गृह बांधण्याचे आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही. येथील अनेक पंपन्या बंद झाल्याने बेरोजगारी वाढली असून गुन्हेगारीमध्येही यवतमाळ जिल्हा आघाडीवर असल्याचे ते म्हणाले.