
पावसाळी अधिवेशनाच्या चौदाव्या दिवशी विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विधानसभा अध्यक्ष दुतोंडी भूमिका घेत असल्याने विरोधकांनी तीव्र शब्दात निषेध केला. यानंतर विधिमंडळाच्या बाहेर विरोधकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सत्ताधारी आणि अध्यक्षांच्या कारभारावर ताशेरेही ओढले. यावेळी शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव आणि शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना पुढे आणले, आमदारकी दिली, मंत्रीपद दिले, मुख्यमंत्री स्वत:कडे ठेवणारे नगरविकास खाते दिले. नगरविकास खाते किंवा समृद्धाने भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांच्या घरी ईडी पोहोचली, म्हणून त्यांना सूरतला पळून जावे लागले. वाशिंग मशीनमध्ये उडी घ्यावी लागली. त्यामुळे उद्धव साहेबांवर आरोप करताना थोडी तरी लाज बाळगा. एवढी एहसान फरामोश, नमक हराम, निर्लज्ज व्यक्ती मी कधी पाहिली नाही, असा संताप व्यक्त करत आदित्य ठाकरे यांनी मिंध्यांची सालटी काढली.
आदित्य ठाकरे म्हणाले की, गेल्या तीन आठवड्यांपासून विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो, दोन्ही बाजुने मंत्रीमंडळात अनेक विषयांवर प्रश्न उपस्थित करत आहोत. ते बॅकफूटवर जावेत अशी आमची भूमिका नाही. पण बेस्ट, शेतकरी आत्महत्या, धारावीच्या जमीन घोटाळ्याचा विषय असो किंवा इतर सर्वांची उत्तरं सरकारकडून हवी असतात. दोन्ही बाजुच्या आमदारांना उत्तरे हवी असतात. आम्ही जनतेतून निवडून आलेलो लोक असून आम्हाला मतदारसंघातील जनतेला उत्तर देणे भाग आहे. ते आमचे कर्तव्यही आहे.
विधिमंडळामध्ये 293 च्या भाषणातही मी अनेक विषय मांडले. धारावीत होणारा जगातील सर्वात मोठा घोटाळा असो किंवा बेस्ट कशी संपवत चालले आहेत ते असो किंवा शिक्षणाची कशी वाट लावून ठेवली आहे किंवा आरोग्य खात्याचे कसे वाटेळे करून ठेवले आहे ते असो. या विषयांवर नगरविकास खात्याचे मंत्री उत्तर देत होते. पण आम्ही घाणेरडे भाषण ऐकण्यासाठी किंवा दोन अडीच वर्षापासून जो खोटारडेपणा सुरू आहे ते ऐकण्यासाठी इथे आलोलो नाहीत. राईट टू रिप्लायसाठी गेले तेव्हाही समोरून आरडाओरडा सुरू झाला, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबई-पुणे मिसिंग लिंकमध्ये एवढी किंमत का वाढली? कामाला एवढा उशीर का झाला? नॉर्थ बाऊंड कोस्टल रोडमध्ये किती वेळा कॉन्ट्रॅक्टर बदलले? साडे सहा हजार कोटींचे एक्सलेशन काय आहे? ज्या मिनिटाला आमचे सरकार पाडले तेव्हाही कोस्टल रोडच्या कामात एक्सलेशन केले. जिथे जिथे भ्रष्टनाथ मिंधेंनी हात घातलेला आहे, तिथे सगळीकडे पैसे काढण्याचे काम केले आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांनी आपण भ्रष्टनाथ मिंधेंना एहसान फरामोश, नमक हराम का म्हणाले हे देखील सांगितले.
ज्या व्यक्तीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे आणले, आमदारकी दिली, सलग मंत्रीपद दिले, कुठलाही मुख्यमंत्री स्वत:जवळ ठेवतो ते नगरविकास खाते दिले, त्या व्यक्तीने आमचेच सरकार पाडले. नगरविकास खाते किंवा समृद्धीमध्ये काय घोटाळे केले त्यामुळे ईडी त्यांच्या घरापर्यंत पोहोचली. म्हणून यांना सूरतला पळून जावे लागले. वाशिंग मशीनमध्ये उडीही मारली. त्यामुळे उद्धव साहेब किंवा आमच्या पक्षावर आरोप करताना थोडी तरी लाज बाळगा. समोर आल्यावर डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाहीत. विधिमंडळात मुख्यमंत्री स्वत: उत्तरे द्यायला येतात, मग यांना काय अडले आहे? त्यामुळे उत्तरे द्यायचे असतील तर विचारलेल्या प्रश्नांना द्या, रटाळ भाषण करू नका, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी मिंध्यांवर केला.