बहोत हुए खोके-धोके… आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघात

महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय देशमुख हे आज यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विदर्भात जाहीर सभा घेत भाजपवर जोरदार घणाघात केला. यवतमाळ वाशिम मतदारसंघात अजूनही विरोधी उमेदवार दिलेला नाही. त्यावर निशाणा साधताना आता जनताच यांना सांगेल की, बहोत हुए खोके-धोके, अब घर बैठो रोके रोके, असे शाब्दिक फटकारे आदित्य ठाकरे यांनी भाजप-मिधेंवर मारले.

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात झालेल्या जाहीर सभेत आदित्य ठाकरे म्हणाले की, मला माहितीये ऊन आहे, उष्णता वाढतेय, अनेक लोक न जेवता वेगवेगळ्या गावांतून आलेला आहात. त्यासाठी मी तुमची माफी मागतो. तरी देखील आज हे वातावरण पाहून हे पक्कं झालंय की, यवतमाळ-वाशिम आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच. कारण तुम्ही भाड्याने आणलेले नाही आहात किंवा तुम्हाला कुणी खेचूनही इथे आणलेलं नाही. जसं, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये आणतात, मग मुख्यमंत्री बोलायला उभे राहिले की तेच लोक पळून जातात. तसं इथे कुणी पळणारं नाही. ही आपली महाराष्ट्राची जनता आहे, तुम्ही मला इथे प्रेम आणि आशीर्वाद द्यायला आलेले आहात. हे मी माझं भाग्य समजतो की, पोहरादेवीच्या या परिसरात, संत सेवालाल यांच्या भूमीत या प्रचाराची ही माझी पहिली सभा होतेय, हे माझं भाग्य आहे. मी इथे तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे, अशी भावनिक साद त्यांनी यावेळी उपस्थित जनतेला घातली.

‘आज देशात वातावरण बदलत आहे. परिवर्तनाचे वारे वाहायला लागले आहेत. आणि मला ही खात्री पटलेली आहे की गेली अडीच वर्षं मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाहतो आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जे पाहतो आहे. की जो बदल घडणार आहे, तो घडवण्यात सगळ्यात अग्रेसर राहील तो आपला महाराष्ट्र असेल. कारण आपला महाराष्ट्र स्वाभिमानी आहे, तो कधीच अन्याय सहन करत नाही. परवा इंडिया आघाडीची दिल्लीत सभा झाली. दिल्लीतली ती सभा ही प्रचाराची किंवा निवडणुकीची सभा नव्हती. पण तिथे सुनीता केजरीवाल ताई असतील किंवा कल्पना सोरेन ताई असतील, या आपल्या बहिणींना ताकद देण्यासाठी ही सभा झाली. कारण त्या दोघी एका महाशक्ती विरोधात लढत आहेत. ही महाशक्ती आता हुकूमशाही होत चाललेली आहे. दिल्लीत जे वातावरण मी पाहिलं, त्यावरून मी इथे दाव्याने सांगतो की दिल्लीतल्या सातही जागा काँग्रेस आणि आप जिंकणार म्हणजे जिंकणारच.’ असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

‘भाजपचे ईडी-सीबीआय आणि आयटी हे मित्रपक्ष आहेत. इथे सगळ्यांनीच त्यांच्याबद्दल ऐकलं असेल. ऐन निवडणुकीत या तीन मित्रपक्षांनी अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन या दोन मुख्यमंत्र्यांना अटक केली आहे. का? कारण ते भाजपच्या विरोधात लढत आहेत. भ्रष्टाचारी लोकांविरोधात लढत आहेत. या दोन अटकांमुळे देशाची, आपल्या हिंदुस्थानची बदनामी जगभरात झाली आहे. भाजपमुळेच ही बदनामी जगभर केली आहे. त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे.’

‘गेली पाच दहा वर्षं आपण अन्यायाविरोधात लढत आहोत. 2019पासून जो अन्याय सहन करत आलो आहोत. कालच एप्रिल फूल दिवस होता. मी कुणालातरी फोन करून या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर ते म्हणाले, एप्रिल फूलची आपल्याला गरज नाही. कारण आपण देशात अच्छे दिन आपण साजरे करतच आहोत. गेली दहा वर्षं एकामागोमाग एक जुमल्यांविषयी आपण ऐकत राहिलो. आपण शिवसेना म्हणून त्यांना बळी पडलो, 25 वर्षं मित्रपक्ष म्हणून त्यांच्या सोबत राहिलो. जेव्हा त्यांच्या सोबत कुणीही नव्हतो तेव्हा शिवसेना म्हणून त्यांच्या कठीण काळात उभे राहिलो. जेव्हा भाजपचे अच्छे दिन आले आणि आपण त्यांना विचारलं की देशाचे अच्छे दिन कधी येतील, तेव्हा त्यांनी युती तोडली. 2014मध्ये त्यांनी ही युती तोडली आणि बाहेर काढल्यावर सांगितलं की आम्ही धोका दिला. 2019मध्येही लोकसभेसाठी आपल्याला वापरून घेतलं. यूज अँड थ्रो हीच त्यांची पॉलिसी आहे. हे धोरण त्यांचं दिसून येत आहे. जे 40 गद्दार त्यांच्यासोबत गेले, त्यांचीही हीच गत झाली आहे.’

‘आज आपल्याकडून संजय देशमुख यांना तुमच्यात फिरणारा, तुमची कामं करणारा माणूस म्हणून लोकांसमोर उमेदवारी दिली. महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केले आहेत. ते उमेदवार तुमच्या मनात आहेत. लवकरच तुम्ही त्यांना दिल्लीला पाठवणार ही मला खात्री आहे. पण, समोरून उमेदवार जाहीर झालेले नाहीत. भाजपचे उमेदवार असतील की मिंधे गटाचे असतील? निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी 72 तास राहिलेले असताना अजून विरोधी उमेदवार उभा केलेला नाही. हे एक चांगलं चित्र आहे. महाविकास आघाडीच्या ताकदीला भाजप-मिंधे घाबरलेले आहेत. म्हणून समोरून उमेदवार दिलेला नाही. कदाचित या उमेदवारांवर बोली लागली असेल. कारण हेच यांचं काम आहे. खोके आणि धोके. आता जनता सांगेल की बहोत हुए खोके-धोके अब घर बैठो रो के रोके..’ अशा शब्दांत त्यांनी भाजपवर घणाघात केला.

‘मी महाराष्ट्रात जिथे जिथे गेलो, ज्या ज्या शेतकऱ्याला भेटलो, जिथे जिथे बांधावर गेलो. तिथे मला शेतकरी भेटून सांगतात की, उद्धव ठाकरेंनी केलेली कर्जमुक्ती आम्हाला मिळाली. पण आधीच्या आणि नंतरच्या कर्जमुक्ती या फसव्या होत्या. उद्धव ठाकरेंनी दिलेलं वचन पाळलं. पण, त्यानंतर जे अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसलं आहे, त्या सरकारने कर्जमुक्ती सांगितली; पण दिली नाही. आज मिंधे गट आणि फुटलेला राष्ट्रवादीचा गट हे पक्ष मानलेच जाऊ शकत नाहीत. कारण, ते गद्दार आहेत, ज्यांनी पक्ष चोरला, ज्यांनी नाव चोरलं. अशा लोकांना आपण पक्ष म्हणून पाहूच शकत नाही. पण 2022 ते आजपर्यंत शेतकऱ्यांवर जे काही नैसर्गिक संकट आलं, आश्वासनापुढे एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यात आला का? सरकारी यंत्रणेने पंचनामे केले असतील, पण त्यापुढे मदत आली का? कर्जमुक्ती बॅनरवर आली असेल. पण त्यानंतर बॅनरचं परिवर्तन खात्यात झालं का? म्हणूनच आज शेतकऱ्यांना पुढची पिढी शेतकरी व्हायला नको आहे. कारण, कापूस-सोयाबीनला भाव नाही. खतांचे भाव वाढलेले आहेत. पेट्रोल वाढत चाललं आहे. वीज आली तर रात्री येते. हे सगळं होतं असेल तर मुलांनी नोकऱ्या कराव्यात असं वाटतं. पण, सगळं शिक्षण होऊनही राज्यात आज नवा रोजगार उपलब्ध नाही. नवीन कोणताही उद्योग राज्यात आलेला नाही. कारण मिंधे सरकारने उद्योग गुजरातला पाठवले, अशी जोरदार टीका आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारवर केली.