शक्य झालं तर महाराष्ट्राचं मंत्रालयही मिंधे गुजरातला नेतील, आदित्य ठाकरेंचा घणाघात

गेली अडीच वर्षं महाराष्ट्रात मिंधे सरकारने एकही नवीन उद्योग आणला नाही. उलट जसं स्वतः लपूनछपून सूरतला पळाले, तसे त्यांनी महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवले. थोड्या दिवसात मिंधे महाराष्ट्राचं मंत्रालयही गुजरातला नेतील, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारवर केला.

ठाण्यातील आनंदनगर येथे शिवसेनेच्या शाखेला भेट दिल्यानंतर झालेल्या सभेत आदित्य ठाकरे यांनी मिंध्यांवर शाब्दिक आसूड ओढले. ठाणेकरांच्या उद्धव ठाकरे यांच्यावरील विश्वासाविषयी बोलताना ते म्हणाले की, जेव्हा जेव्हा ठाण्यात आलो तेव्हा ठाणेकरांनी इतकं प्रेम दिलं की कधीही असं वाटलं नाही की आपल्यातून कुठले गद्दार गेले. गद्दार गेले तरी ठाणे शिवसेनेचंच राहिलं आहे. आपण इथे अनेक कार्यक्रम घेतले. पण या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. जिथे महिला असतात तिथे विश्वास, बांधिलकी, कुटुंब असतं. उद्धव साहेबांना कुटुंब प्रमुख म्हणून जे ओळखलं जातं, ते मला इथे दिसतंय. कारण महिलांचा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे या एकमेव व्यक्तिवर आहे. कारण, ते जिथे असतील तिथे प्रगती आहे, सुरक्षा आहे, विश्वास आहे, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

मिंधेंच्या रडारडीवरही त्यांना टीकेचे आसूड ओढले. ‘हल्ली आपल्या राज्यात एक नवीन फॅशन झाली आहे, खोटं बोला पण रडून बोला. आधी भाजप बोलायचा की खोटं बोला पण रेटून बोला आता मिंधे बोलतात, खोटं बोला पण रडून बोला. काल एवढ्यासाठीच त्यांनी अधिवेशन घेतलं होतं, जेणेकरून मुलाने सांगावं माझे वडील किती अपयशी आहेत, हे लोकांसमोर सांगायलाच अधिवेशन घेतलं होतं. जास्त मीही पाहिलं नाही कारण त्यांची रडारड अनेक वर्षं पाहिली आहे. काहीही झालं की रडारड करायची, अश्रू काढायचे आणि जे काही हवं ते मिळवायचं. पण आता लोक ओळखायला लागले आहेत. किती उदाहरणं देऊ. जसं काल ते रडले की मी नवरा म्हणून, वडील म्हणून अपयशी ठरलो. दोन तीन दिवसांनी म्हणाल की मी घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरलो. शिवसैनिक म्हणून तर अपयशी ठरलातच. पण, काही दिवसांनी तुम्हीही म्हणाल की माणूस म्हणूनही तुम्ही अपयशी ठरलात. ज्या नेत्याने, परिवाराने, पक्षाने तुम्हाला सगळं काही दिलं, त्या व्यक्तिचा बाप, पक्ष, इमान चोरायला तुम्ही निघालात. सगळं काही चोरायचा प्रयत्न केलात. पण आज या महाराष्ट्रातून दोन गोष्टी पुसल्या जाऊ शकत नाहीत. एक उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम, दुसरं म्हणजे तुमच्या माथ्यावरचा गद्दार, बापचोर, पक्षचोर लिहिलेला शिक्का कुणीही पुसू शकत नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

‘उल्हासनगरमध्ये नगरसेवक पदाला उत्सुक असलेला धीरज ठाकूर नावाचा मुलगा होता. कल्याणमध्ये त्याने दिवसरात्र मेहनत घेतली. त्यावेळी हे पालकमंत्री होते, त्यावेळी मी त्याला एक संधी देण्याविषयी बोललो होतो. पण, त्यावेळी मातोश्री अशी रडारड सुरू केली. ते पाहून मी तो विषय तुम्हाला लखलाभ म्हणून सोडून दिला. तसंच, हल्ली इकडचेच एक जे मला शिव्या देतात, ते काही वर्षापूर्वी आले होते. त्यांना उद्धव ठाकरे शहरातलं तिकीट देणार होते. पण, तिथे हे पण रडताहेत, ते पण रडताहेत. एकमेकांना शिवीगाळ आणि पुन्हा रडारड. एवढंच काय, कल्याणमध्ये त्यांनी नाटक केलं होतं ना की मांडीला मांडी लावून मी बसू शकत नाही आणि म्हणून… मी म्हणालो की हा काय प्रकार आहे.. 20 मे 2022 रोजी वर्षा बंगल्यावर येऊन हे असेच रडले होते. भाजप मला आत टाकेल, मला तुम्ही यातून वाचवा. बरोबर एक महिन्यात ते भाजपमध्ये गेले आणि पक्ष चोरायचा प्रयत्न केला. आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून आज अवकाळी सरकार म्हणून आपल्या डोक्यावर बसले आहेत. पण आज सगळी यंत्रणा असूनही तुम्ही आज रडत आहात. सामान्य शिवसैनिकांना, नागरिकांना छळण्यासाठी तुम्ही पोलिसांना वापरताय. ईडी-आयटी-सीबीआयचा पुरेपूर वापर करताय. दादागिरी करताय. गुंडांचे कटआउट्स झळकवताय. हे असं राज्य चाललं आहे. ही गुंडांची फौज त्यांनी मंत्रालयात रिल करायला सोडली आहे आणि पोलिसांना यांना सलाम करायला लावत आहेत. गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्रात यांच्या सरकारने एकही नवा उद्योग आणलेला नाही. नवीन रोजगाराची संधी नाही, नोकरी नाही. नोकरभरतीत घोळ झालेला आहे. पण, आपल्याकडच्या अनेक गोष्टी त्यांनी गुजरातला पळवून लावल्या. जसं स्वतः लपून छपून ते गुजरातला पळाले. तसं आता ते महाराष्ट्रातून एकेक गोष्ट गुजरातला पाठवताहेत. माझी तर अशी शंका आहे की थोड्या दिवसात यांचं मंत्रालयही गुजरातला हलवतील, अशी घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी यावेळी केली.