फडणवीससाहेब, भांडणातून लक्ष बाहेर काढा आणि महाराष्ट्राच्या जनतेकडे लक्ष द्या – आदित्य ठाकरे

छत्रपती संभाजीनगर शहरात भयंकर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराला बारा ते पंधरा दिवसांनी पाणी मिळत आहे. महापालिका प्रशासनाच्या या तुघलकी कारभाराला वाचा फोडण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज महापालिकेवर ‘हल्लाबोल महामोर्चा’ काढण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. आदित्य ठाकरे स्वत: हातात भगवा झेंडा घेऊन क्रांती चौकातून निघालेल्या मोर्चात चालत होते.

या मोर्चानंतर आदित्य ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत राज्यातील महायुती सरकावर जोरदार टीका केली. ” छत्रपती संभाजीनगर शहरात कधी दहा दिवसानंतर कधी पंधरा दिवसानंतर पाणी येतंय. जे पाणी येतंय ते पिण्यासारखं नाहीए. पाणी येतंय की कोको कोला येतंय तेच समजत नाहीए. अक्षरश: काळं पाणी येतंय. संभाजीनगरला कशामुळे असं पाणी येत आहे? कोणामुळे मिळत आहे, आम्ही काय पाप केलंय? या मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला सांगितलं पाहिजे तर आणि तरच हे आंदोलन थांबेल नाहीतर हे आंदोलन थांबणार नाही. हे आम्ही आज इथे इशारा द्यायला आलेलो आहे. मला ते ही दिवस आठवतात. जेव्हा फडणवीस विरोधीपक्ष नेते होते. याच रस्त्यावर आंदोलन केलं होतं तेव्हा भाषण केलं होतं. आमचं सरकार आलं तर पाणी देऊ. फडणवीस साहेब फक्त ओरडून चालत नाही, काम करावं लागतं. काम करायची धमक उद्धव ठाकरेंमध्ये होती, ती तुमच्यात असेल तर काम करून दाखवा, या शहराला पाणी देऊन दाखवा. पण नुसतं आरोप करायचं, जातीय भांडणं लावायची. तोडफोड करायची. धार्मिक भांडणं लावायची. आरोप प्रत्यारोप करायचे. जेव्हा तुम्ही त्या खुर्चीवर बसता ना तेव्हा तुम्ही काय करून दाखवलीव काय करायची आहेत ते दाखवायचं असतं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“‘या शहराला तुम्ही रोज पाणी देणार असं सागितलेलं. पण आपण भांडणात व्यस्त आहात. एसंशि गट आणि दादांचा गट आपल्याशी भांडत आहेत. वेगेवगळ्या विषयांवरून भांड़त आहेत. फडणवीसांना या भांडणात व्यस्त ठेवलं आहे. फडणवीस साहेब भांडणातून लक्ष बाहेर काढा आणि महाराष्ट्राच्या जनतेकडे लक्ष द्या. आज महाराष्ट्रात कोणताही जिल्हा असा नाही की गुन्हेगारी वाढलेली नाही. महाराष्ट्र पोलिसांचे हात मोकळे करा कसा महाराष्ट्रातून गुन्हेगारी थांबवतात की नाही ते बघा. सगळे गुन्हेगार तुम्हाला तुमच्या पक्षात घ्यायचे आहेत. त्यांची मदत घेऊन तुम्हाला निवडणूका जिंकायच्या आहेत, असं आदित्य ठाकरे यांनी भाजप व फडणवीसांना सुनावले,

धर्माचा चष्मा बाजूला ठेवा

फडणवीससाहेब, धर्माचा चष्मा बाजूला ठेवा आणि माणसाला माणूस म्हणून बघा… माणूसकीच्या चष्म्यातून एकदा बघा. कदाचित नंबर वाढला असेल,डोळ्याची तपासणी करून घ्या. पण आज या महाराष्ट्रात जात पात धर्म न पाहता. महाराष्ट्र हैराण आहे. तो याच कारणामुळे आहे की तुमचं सरकार आमच्या राज्याकडे लक्ष देत नाही. काय काय वचन दिली होती तुम्ही. काही महिलांनी लाडकी बहिण योजनेला मतदान केलं असेल कारण तुम्हाला वाटलं असेल की 1500 चं 2100 करून मिळेल. लाडकी बहिण योजा यशस्वीरित्या चालवत आहे का ? राखी बांधून महिलांची राखरांगोळी करणारे हे पहिले भाऊ असतील, खोटं बोलणारे हे पहिले भाऊ असतील, महिलांना सरंक्षण न देणारे हे पहिले भाऊ असतील. हे भाऊ आहेत की भावखाऊ आहेत. महाराष्ट्रात महिलांचे हाल असे झालेत. ज्यांनी विश्वास ठेवलाय या भावांवर की होय मला एकवीसशे करून मिळतील ते तर झालेच नाही. पण 1500 चे 500 झाले. काही महिलांबद्दल असं झालं की हेच सरकार निर्लज्जपणे सांगतायत की चुकीने तुम्हाला पैसे दिले आहेत परत द्या नाहीतर तुम्हाला दंड लावू, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

या शहरावरं प्रेम करणारं या सरकारमध्ये कुणी नाही

” नक्की या राज्यात चाललंय तरी काय? हा प्रश्न विचारला तर तुम्हाला भलतीकडे नेतील. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. होय रामराज्य आम्हाला पण आणायचं आहे. रघुकुल रित सदा चलोआए, प्राण जाये पर वचन ना जाये. या सगळ्या झूठी कारभारमधील आमदार येतील तेव्हा त्यांना विचारा आम्हाला पाणी कधी देताय. वचन पूर्ण कधी करताय. नसेल करणार तर राजीनामा द्या आणि निघून जा आमच्या राज्यातून. दुर्दैव असं आहे या शहरावरं प्रेम करणारं या सरकारमध्ये कुणी नाहीए. हे शहर महत्त्वाचं आहे. गेले य़ा शहराला आपलं मानणारं कुमी नाहीए. हे शहर पर्यटनासाठी महत्वाचं आहे, उद्योगासाठी महत्त्वाचं आहे, सुभाष देसाई पालकमंत्री होते तेव्हा आम्ही काही किलोमीटरच्या अंतरावर ऑरेंज सिटी बांधली. जगभरात कुठेही जायचो तेव्हा सांगायचो की यायचं असेल तर छत्रपती संभाजीनगरला या, ऑरेंज सिटीला य़ा असं सांगायचो. आमच्या स्थानिक भूमीपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे, नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

या शहरात दुष्काळ जाहीर करा

आज या सरकारने आपल्याला लढायांमध्ये व्यस्त ठेवलं आहे. पाणी, धर्म जात यातच व्यस्त ठेवलं आहे. कारण हे जे पैसे खात आहेत ते आपण पाहू नये आपल्या डोळ्याला झापड लावून ठेवली आहेत. ही भाजप गेली अकरा वर्ष केंद्रात व राज्यात महाविकास आघाडीची अडीच वर्ष सोडली तर दहा वर्ष सत्तेत आहे. हीच भाजप निर्लज्जपणे महापालिकेत आपल्यासोबत होती. हीच भाजपा आपल्यासोबत पंचवीस वर्ष एकहाती सरकार नव्हतं तेव्हा सरकारमध्ये होती आणि त्याच्यात राज्य सरकारचे जे काही फायदे होते ते उचलायला आपल्या सोबत होती. आज आपल्या अंगावर येतायत. तुम्ही विचार करा आपल्या महाराष्ट्राबद्दल भाजपच्या मनात राग केवढा आहे. छत्रपती संभाजीनगर एक शहर आहे. त्या शहराला नियमित पाणीपुरवठा का नाही होऊ शकत? या महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची जी परिस्थिती उद्भवलेली आहे. ग्रामीण भागात जसं दुष्काळ होतो तसा एकतर या शहरात दुष्काळ जाहीर करा. नाहीतर लबाडांनो पाणी द्या, असे आव्हानं आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारला केले.