मिंधे ते मिंधेच…50 खोकेवाले, 40 टक्केवाल्यांचा प्रचार करायला गेलेत, आदित्य ठाकरे यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

50 खोकेवाले कर्नाटकात 40 टक्केवाल्यांच्या प्रचाराला गेलेत आणि इथे महाराष्ट्रात 40 टक्केच काय, अख्खं सरकारच बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर चालवतात, असा जबरदस्त हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी कर्नाटकात गेले असून याबाबत माध्यमप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर ते देत होते.

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी गेले आहेत. सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी उमेदवारांच्याविरोधातही ते प्रचार करणार असल्याचे वृत्त आहे. याबाबत विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, 50 खोकेवाले, 40 टक्केवाल्या सरकारच्या प्रचाराला गेले आहेत. खरे तर तिथे जाऊन त्यांनी मराठी बांधवांचा आवाज ऐकणे गरजेचे होते. महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करणे गरजेचे होते, पण मिंधे ते मिंधेच.

बारसूमधील प्रस्तावित रिफायनरीबाबत विचारले असता ते म्हणाले की, सरकार चर्चेला जाणार नाही. मुळात हे सरकार स्वत:साठी बसलेले आहे. आजही घटनाबाह्य मुख्यमंत्री कर्नाटकात गेले असून त्यांनी आधी महाराष्ट्राचा विचार करणे गरजेचे होते. पण स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी त्यांच्या ‘बॉस’चे ऐकूण ते कर्नाटकात प्रचाराला गेले आहेत. 50 खोकेवाले आणि 40 टक्केवाले एकमेकांकडून काय शिकतील हे आज ऐकण्यासारखे असेल.

सरकारला टोला

आज जागतिक हास्य दिन आहे. सुखी, निरोगी आणि आनंदी जीवनासाठी हास्य हे अत्यंत गुणकारी औषध आहे. पण हास्य आणि ‘हास्यास्पद’ यातला फरक लक्षात असायला हवा. आत्ता महाराष्ट्रात अवकाळी सरकारचा जो अनागोंदी कारभार सुरु आहे, तो हास्यास्पद आहे. त्याने जनतेचं आयुष्य आनंदी व सुखकर होण्याऐवजी भयंकरच होताना दिसतंय, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला लगावला.