
संभाजीनगरमधील रांजनगाव शेणपुंजी येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट चषकाचे उद्घाटन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या भाषणातून मिंधे गटावर निशाणा साधला आहे.
शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त रांजणगाव, जि.संभाजीनगर येथे आयोजित ‘हिंदुहृदयसम्राट चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस आज उदघाटक म्हणून उपस्थित होतो. pic.twitter.com/RQ1grRmVWk
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 22, 2023
”राज्य ओके नाहीए पण ते बसलेयत ओके होऊन. कुणी 50 खोके घेतले आहेत. कुणी 9 लायसन्स मागवले. उद्या हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानभवनात लावण्यात येणार आहे. जे अनावरण करणार आहेत ते घटनाबाह्य मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या मनातून भीतीची व गद्दारीची भावना आहे ती त्यांच्या मनातून निघून जावी. कशाची भीती होती माहित नाही. कुणाकडून लपवायचं होतं माहित नाही. पण एवढं खाल्लं होतं की अपचन झालं होतं. ते लपवायला यांना गुवाहटीला जावं लागलं. त्या हातांनी ते हे अनावरण करणार आहेत. माझे आजोबाही विचार करत असतील काय हे गद्दार लोकं माझ्या तैलचित्राचं अनावरण करत आहे” , असा टोला आदित्य ठाकरे यांनी मिंधे गटाला लगावला आहे.
” हिंदुहृदसम्राट म्हटल्यानंतर, शिवसेनाप्रमुख म्हटल्यानंतर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर एकच माझ्या मनात येतं ते म्हणजे हिंमत ताकद जिद्द निष्ठा. इथे तुम्ही सर्व जे काही करत आहात, शिवसेना प्रमुखांच्या नावाने करत आहात. मला आनंद याचा आहे की आपला साध्यातला साधा कार्यकर्ता हे सर्व लोकांसाठी करत आहे. याला म्हणतात निष्ठा, याला म्हणतात ताकद”, असेही ते म्हणाले.































































