मंत्री ‘ईव्ही’तून फिरताहेत; सामान्य लोकांनी काय करायचे? आदित्य ठाकरे यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी इलेक्ट्रिक कारमधून (ईव्ही) फोटोसेशन करणाऱ्या महायुतीच्या मंत्र्यांवर आज जोरदार हल्ला चढवला. मंत्री महागड्या ईव्हीतून फोटोसेशन करत फिरताहेत, पण ज्यांना ईव्ही परवडत नाही त्या सर्वसामान्यांचे काय असा सवाल उपस्थित करतानाच, बेस्ट आणि मेट्रोचे तिकीट स्वस्त करा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

इंधन वाचवण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यानंतर राज्यातील महायुती सरकारचे मंत्री एकामागोमाग एक इलेक्ट्रिक कार खरेदी करू लागले आहेत. तसेच त्या आलिशान कारमध्ये बसून प्रसारमाध्यमांसमोर फोटो सेशनही करत आहेत. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत महायुती सरकारवर टीका केली आहे.

महाविकास आघाडी सरकारने 2021 मध्ये ईव्ही धोरण आणले होते. त्यानुसार 2022 पासून सर्व मंत्री, सर्व सरकारी विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना नवीन गाड्या खरेदी करायच्या असल्यास किंवा भाड्याने घ्यायच्या असल्यास केवळ इलेक्ट्रिक वाहनेच घ्यावीत असे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र महायुती सरकारने ते धोरण बासनात गुंडाळले असून केवळ प्रसिध्दीसाठी मंत्री, आमदार ईव्ही खरेदी करत आहेत, सरकार केवळ स्वतःच्या सोयीचे राजकारण करत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

इलेक्ट्रिक वाहने वापरताहेत, पण वीजही परवडणारी हवी

ईव्ही वापरणे पुरेसे नाही, तर त्यासाठी लागणारी वीजही परवडणाऱ्या दरातील हवी याचीही आठवण आदित्य ठाकरे यांनी करून दिली आहे. ती वीज स्वच्छ म्हणजेच क्लीन एनर्जी असावी जी सौरऊर्जा किंवा पवन ऊर्जेसारख्या स्रोतांमधून मिळवावी अशीही तरतूद ईव्ही धोरणामध्ये होती. परंतु त्याचा विसर महायुती सरकारला पडला आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.