विरोधी पक्ष डिझास्टर टुरिझममध्ये व्यस्त, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे तडाखे

1826

सध्या लोकांना फिट ठेवण्यावर आमचा भर असून विरोधी पक्ष मात्र इथल्या डिझास्टर टुरिझममध्ये व्यस्त आहे. जगातील पाहिले असे उदाहरण असेल की राज्याचे बरे-वाईट झाल्यावर विरोधकांना आनंद होत आहे असे तडाखे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लगावले. एमएमआर रिजनमधील कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, मीरा-भार्इंदर महापालिका, अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक कल्याणमध्ये घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी इतर राज्यांचाही दौरा करून महाराष्ट्रातील आरोग्य सेवेची तुलना करावी असा सल्लाही त्यांनी दिला.

कल्याणच्या वाधवा हॉल येथे झालेल्या बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कशाप्रकारे काम सुरू आहे याची माहिती घेण्यात आली. रुग्णांची वाढणारी संख्या आटोक्यात आणण्यासाठी धारावीच्या धर्तीवर ‘चेस द व्हायरस’ मोहीम अधिक तीव्र करण्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी आदेश दिले. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर द्या, टेस्टस्ची संख्या वाढवा, आकडे वाढलेले दिसले तरी घाबरून जाऊ नका अशा सूचनाही त्यांनी आयुक्तांना केल्या. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीतील तोकड्या आरोग्य यंत्रणेवर बोट ठेवत टीका केली होती. याविषयी पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, विरोधी पक्ष हेल्थ आणि डिझास्टर टुरिझम करत आहे. तर आम्ही मात्र लोकांची मदत कशी करता येईल याकडे लक्ष केंद्रित केले आहे. राज्याचे बरेवाईट झाले तर आनंद होणारा हा जगातील एकमेव विरोधी पक्ष असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर विनिता राणे यांच्यासह सर्व पालिकांचे आयुक्त उपस्थित होते.

मृत्यूदर कमी ठेवण्याला प्राधान्य
मुंबई आणि ठाण्याच्या धर्तीवर कल्याण – डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर आदी ठिकाणीही जम्बो आरोग्य सुविधा उभारण्यात येत आहेत. एकही नागरिक उपचारांपासून वंचित राहणार नाही असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी दिला. मृत्यूदर कमी ठेवणे याला प्राधान्य देण्याबाबत प्रशासनाने दक्ष रहावे असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या