रुपया ९० पार! अर्थमंत्र्यांकडून चकार शब्द नाही, ‘अच्छे दिन’ फक्त इतरांसाठीच का! आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्ला

हिंदुस्थानी रुपया डॉलरच्या तुलनेत विक्रमी ९० हून अधिक खालच्या पातळीवर घसरल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आणि विशेषतः अर्थमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

बुधवारी रुपयाची झालेली ऐतिहासिक घसरण आणि त्या तुलनेत काही इतर जागतिक चलनांसमोर त्याची झालेली अधिक वाईट कामगिरी याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे:

‘रुपया आज डॉलरच्या तुलनेत ९० पार गेला आहे. काही इतर चलनांसमोर तर तो आणखी वाईट कामगिरी करत आहे.’

या गंभीर आर्थिक परिस्थितीवर अर्थ मंत्रालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया न आल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी थेट अर्थमंत्र्यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘अर्थमंत्र्यांकडून चकार शब्द नाही.’

‘अच्छे दिन’ वरून सरकारला टोला

२०१४ मध्ये भाजपने ‘अच्छे दिन’चे दिलेले आश्वासन आणि सध्याची परिस्थिती याचा संदर्भ देत ठाकरे यांनी सरकारला जोरदार टोला लगावला.

‘२०१४ मध्ये भाजपने ‘अच्छे दिन’चे आश्वासन दिले होते. माझ्या मते, ते ‘अच्छे दिन’ हिंदुस्थानसाठी नव्हे, तर इतरांसाठी होते’.

देशाची सध्याची परिस्थिती ‘स्पाय ॲप्स’ (Spy Apps) आणि ‘स्पाय साथी’ (Spy Saathi) अशी आहे, असा उल्लेख करून त्यांनी हेरगिरीच्या मुद्द्यावरूनही केंद्रावर टीका केली.