
मुंबईला स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापनाचे अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यामुळे 2016-17 मध्ये दररोज दहा हजार मेट्रिक टन असणारे कचऱ्याचे प्रमाण आता सहा ते साडेसहा हजार मेट्रिक टनांवर आले आहे. प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे हे शक्य झाले असून नव्या उपक्रमांमुळे मुंबई लवकरच कचरा व्यवस्थापनात जगासाठी ‘मॉडेल सिटी’ ठरेल असा विश्वास पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
पालिकेच्या ‘घनकचरा व्यवस्थापन – 2030’ उपक्रमाचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. पालिकेच्या सफाई विभागात सुमारे 25 हजार कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. मुंबईला स्वच्छ-सुंदर ठेवण्यासाठी कोविड काळातही या कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केले. त्यामुळे मुंबई स्वच्छ राहत आहे. मुंबईची काळजी घेणाऱ्या पालिकेचा कोरोना लढाही जगासाठी मार्गदर्शक ठरला आहे. त्याच धर्तीवर कचरा व्यवस्थापनाचा उपक्रमही जगासाठी मुंबई ‘मॉडेल सिटी’ ठरेल, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. दरम्यान, या उपक्रमात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ‘कार्बन फुट प्रिंट’मध्ये 20 टक्के घट साध्य करण्याचे उद्दिष्टय़ही निश्चित करण्यात आले. या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त संगीता हसनाळे, घनकचरा प्रमुख अभियंता भारत तोरणे, मिनेश पिंपळे आदी उपस्थित होते.
या उपाययोजना करा!
मुंबईतील फुटपाथ कचराकुंडय़ामुक्त झाले पाहिजेत. नाकाला रुमाल लावण्याची आणि डोळे बंद करावे लागणार नाहीत यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश आदित्य ठाकरे यांनी दिले.
कचरा संकलन दिवसातून दोन वेळा करण्याबाबत विचार. यामध्ये सकाळी लवकर आणि रात्री संकलन करू शकतो का याबाबत विचार करावा. या मोहिमेत दुकानांच्या असोसिएशनचा समावेश करावा. मुंबईकरांनी कचरा होणार नाही, रस्त्यावर थुंकणार नाही आणि ओला कचरा वेगळा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. घनकचरा व्यवस्थापनासाठी ‘व्हिजन 2030’चे उद्दिष्ट असले तरी 2025 पर्यंत हे उद्दिष्ट गाठण्यासाठी काम करावे, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले.



























































