
गेले काही महिने आजरा तालुक्याच्या औद्योगिक प्रगतीचा मानदंड ठरलेल्या आजरा तालुका सहकारी साखर कारखान्यास संजीवनी देण्याच्या कारखाना अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे व सहकाऱयांच्या प्रयत्नांना यश आले आहे. जिल्हा बँकेच्या थकहमीचे सुमारे 70 कोटी रुपये भरल्यावर कारखान्याची सूत्रे संचालकांच्या ताब्यात देण्यात आली. यामुळे पुन्हा एकदा हा कारखाना ‘सहकारा’तच राहिला असून, जिल्हा बँकेकडून संचालकांकडे ताबा मिळाला आहे.
आर्थिक बोजा वाढल्याने 2019 साली कोल्हापूर जिल्हा बँकेने कारखाना ताब्यात घेतला. त्यामुळे 2019 व 2020चे दोन्ही गळीत हंगाम झाले नाहीत. यात इतरांकडून ऊस उत्पादक अक्षरशः नागवला गेला, तर कामगारवर्ग कंगाल झाला. सर्वांचीच जबरदस्त आर्थिक नाकेबंदी झाल्याचे भीषण चित्र निर्माण झाले. ‘आजरा’ कारखाना स्थापण्याचे ध्येय तालुक्यातील एकमेव आमदार वसंतराव देसाई यांनी पाहिले. अखंड परिश्रमातून ते सत्यात उतरविले; पण कारखाना मंजुरी जशी मिळाली, तशा अनेकांच्या ‘अर्थस्वप्नां’ना धुमारी मिळाली आणि शह-काटशह सुरू झाले. त्यातून अध्यक्ष देसाईंवर अविश्वास आणणे, एकमेकांचे गट फोडणे, कामगारांना स्वार्थासाठी वापरणे, दिशाहीन निर्णय घेणे, प्रशासनाच्या गैरकारभारास मूकसंमती आदींमुळे आर्थिक संकट गडद झाले. त्यामुळे पुन्हा कारखान्याची वाटचाल खासगीकरणाकडे सुरू झाली. निविदा काढूनही कोणी प्रतिसाद न दिल्याने ते सर्वांच्या पथ्यावर पडले.
दरम्यान, कारखान्याचे अध्यक्षपद शिवसेनेचे प्रा. शिंत्रे यांच्याकडे एकमताने सोपविण्यात आले. मंत्रालयापासून बँकेपर्यंत अनेकांचे उंबरे झिजविल्याचे चीज झाले. बँकेच्या 70 कोटी कर्जाची परतफेड करण्यात आली. यासाठी कामगारांना निम्म्या वेतनाचे बंधन घालून कोटय़वधींचा बोजा फेडण्यासाठी संस्था, मान्यवर व्यक्ती आणि नेत्यांची मदत घेतली. त्यामुळे या वर्षीच्या गळितास कर्ज मिळण्याच्या वाटा मोकळ्या झाल्याने कारखाना सुरू होणार आहे.
कर्जाच्या ओझ्याने ‘आजरा’ सीलबंद झाल्यावर अत्यंत नाजूक स्थितीत कारखान्याची धुरा मिळाली. कारखान्यावरील कर्जाचे पुनर्गठन झाल्यास कारखाना सुरू होऊ शकतो, हे सूत्र बाळगून प्रयत्न केले. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला. मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री सतेज पाटील व राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी सहकार्य केले. आता कटकसरीच्या तत्त्वावर कारखान्यास नवसंजीवनी देण्यास कटिबद्ध आहे.
– प्रा. सुनील शिंत्रे अध्यक्ष, आजरा कारखाना, शिवसेना सहसंपर्कप्रमुख, चंदगड.
विद्यमान संचालक मंडळाची जबाबदारी वाढली
या पार्श्वभूमीवर विद्यमान संचालक मंडळाची विश्वस्त म्हणून जबाबदारी आणखी वाढली आहे. कारखाना बंद असल्याच्या गेल्या दोन वर्षांत सर्वांनीच, विशेषतः शेतकरी व कामगारांनी बरेचसे भोगले आहे. त्यामुळे आता हा कारखाना कोणत्याही स्थितीत अरिष्टात सापडू न देता चालू ठेवत, कारखान्याचे सभासद, शेतकरी आणि कामगारवर्गाची अपेक्षा पूर्ण करण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे.


























































