
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याचा आज 57 वा वाढदिवस साजरा करणार आहे. बॉलीवूडच्या सुपरस्टारपैकी तो एक आहे. ज्यांच्या चित्रपटांबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही तो कायम चर्चेत असतो. काही महिन्यांपूर्वी आमीरने घटस्फोट घेत असल्याचे सांगितले आणि त्याच्या चाहत्यांना या बातमीने धक्का बसला. मात्र त्यानंतर त्याने त्यावर काहीच न बोलता मौन पाळणे योग्य समजले. मात्र अनेक उलट सुलट चर्चा ऐकल्यानंतर आमीर त्याच्या आणि किरण रावच्या नात्याबाबत मोकळेपणाने बोलला आहे.
न्यूज 18 इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये आमीर आपल्या अयशस्वी लग्न आणि मुलांबाबत खुलेपणाने बोलला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार त्याने कायम कुटुंबापेक्षा कामाला जास्त प्राधान्य दिले. नात्यांबाबत बोलताना आमीर सांगतो मी माझी जबाबदारी पूर्ण करू शकलो नाही. मात्र आता त्या चूकांमधून शिकलोय. आता मी माझे पालक, भाऊ-बहीण, रीना, किरण, रीनाचे पालक, किरणचे पालक आणि मुलांसोबत एक नवीन सुरुवात करणार आहे. ही सगळी माणसं आपल्या अगदी जीवाभावाची असल्याचे त्याने मुलाखतीत सांगितले.
वयाच्या 18 व्या वर्षापासून आमीरने त्याच्या कामाला सुरुवात केली. तो म्हणाला की, मी माझ्या कामात इतका व्यग्र झालो की कुटुंबापेक्षा कामाला प्राधान्य देऊ लागलो. त्यामुळे व्यावसायिक आयुष्यात यशस्वी होत गेलो. मात्र वैयक्तिक आयुष्यात अयशस्वी होत गेलो. कुटुंबाला आणि माणसांना गृहीत धरत गेलो. त्याचा मला आज पश्चात्ताप होतोय, असं आमीरचं म्हणणं आहे.
आमीरने आतापर्यंत त्याच्या सगळ्या चित्रपटात कायम बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांचे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर भाव खाऊन जातात. आमीरचे पहिले लग्न रीना दत्तासोबत झाले असून त्याला जुनैद आणि आयरा अशी दोन मुलं आहेत. तर दुसरे लग्न किरण रावशी झाले असून त्याला आजाद नावाचा मुलगा आहे.






























































