
सामना ऑनलाईन । मुंबई
‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’च्या अपयशानंतर आता मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान त्याच्या आगामी महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या ‘महाभारत’ या चित्रपटावर काम करत आहे. आमीरचे होम प्रोडक्शन या चित्रपटाची निर्मिती करणार असून या चित्रपटात कृष्ण, द्रौपदी, पांडव आणि कौरवांची भूमिका कोण साकारणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी या चित्रपटात कृष्णाची भूमिका आमीर खान साकारत असल्याचे समोर आले आहे. अभिनेता शाहरुख खानने एका मुलाखतीत आमीर खान हा महाभारतात कृष्णाची भूमिका करणार असल्याचे जाहीर केले आहे.

डीएनएला दिलेल्या मुलाखतीत शाहरुखला महाभारत चित्रपटात कोणती भूमिका साकारायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने ‘कृष्णाची भूमिका करायला आवडेल, पण ती भूमिका आमीर साकारणार आहे. त्यामुळे मी कृष्ण साकारू शकत नाही’, असे सांगितले. शाहरुखच्या या उत्तरामुळे महाभारतात आमीर कृष्णाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एक हजार कोटींचे बजेट असलेला या चित्रपटाचे शूटींग 2019 च्या अखेरपर्यंत सुरू होणार असल्याची चर्चा आहे. अद्याप या चित्रपटात इतर कोणते अभिनेते अभिनेत्री असणार आहेत याबाबतही काही समजलेले नाही.
























































