आपला गोव्यात राज्य पक्ष म्हणून मिळाली अधिकृत मान्यता

आप गोवा डेस्क-प्रभारी आणि दिल्लीच्या आमदार आतिशी यांनी माहिती दिली, की गोवा राज्यातील आम आदमी पक्षाला राज्य पक्ष म्हणून मान्यता देणारी अधिकृत अधिसूचना भारतीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. पक्षाच्या या यशाबद्दल स्थानिक नेते आणि स्वयंसेवकांचे अभिनंदन करताना अतिशी म्हणाल्या, की गोवा युनिट 2012 मध्ये गोव्यात स्थापना झाल्यापासून सक्रियपणे कार्यरत आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या प्रामाणिक राजकारणाला पाठिंबा दिल्याबद्दल आणि त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीत सुधारणा झाल्याबद्दल, आम्ही गोव्यातील जनतेचे आभारी आहोत. गोव्याची अस्मिता, संस्कृती आणि पर्यावरण वाचवण्यासाठी जनतेने आम्हाला दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडत राहू, असेही आतिशी यांनी सांगितले.

दिल्ली आणि पंजाबमधील जनता सुशासनाचा आनंद घेत असल्याचे गोमंतकीयांनी पाहिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात आमचे दोन आमदार झाले आहेत. वेळळीचे क्रुझ सिल्वा आणि बाणावलीचे कॅप्टन व्हेन्झी व्हिएगास यांनी चांगले काम केले आहे. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडी (यु) आणि एच.डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जेडी (एस) व्यतिरिक्त, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आप हा तीन राज्यांमध्ये राज्य पक्ष म्हणून ओळखला जाणारा देशातील तिसरा राजकीय पक्ष ठरला आहे.