
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची मोठी वाढ झाल्यानंतर आम आदमी पक्षाने केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ‘आप’चे राष्ट्रीय मीडिया प्रभारी अनुराग ढांडा यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना मोदी सरकारवर सडकून टीका केली. शनिवारी सकाळीच देशातील सर्वसामान्य जनतेवर महागाईचा हा मोठा बॉम्ब पडला असून, यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांचे बजेट पूर्णपणे कोलमडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या २४ तासांपूर्वीच केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढणार नाहीत आणि देशात इंधनाचा पुरेसा साठा असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांच्या या विधानानंतर काही तासांतच दरवाढ लागू झाल्याने केंद्र सरकारच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारचे निर्णय आता देशात नव्हे, तर देशाबाहेर घेतले जात आहेत की काय, असा संशयही ढांडा यांनी यावेळी व्यक्त केला.
अनुराग ढांडा यांनी मोदी सरकारवर अमेरिकेच्या दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जे काही सांगतात, ते मोदी सरकार हात जोडून स्वीकारत असल्याचे त्यांनी म्हटले. सीझफायर, टॅरिफ आणि रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबतचे निर्णय ट्रम्प यांनी जाहीर केले आणि हिंदुस्थानी सरकारने ते निमूटपणे मान्य केले, असे सांगत त्यांनी सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही ताशेरे ओढले. रशियाकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेने हिंदुस्थानला ३० दिवसांची मुदत दिली असून सरकार त्यावर गप्प का आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
घरगुती गॅसच्या या दरवाढीमुळे आता येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही अशाच प्रकारे वाढवल्या जाण्याची भीती जनतेमध्ये निर्माण झाली आहे. केंद्र सरकारची स्वतःची निर्णय घेण्याची क्षमता आता संपली असून, बाजारपेठ, किमती आणि देशाच्या स्वाभिमानाशी निगडित निर्णय आता बाहेरून लादले जात असल्याची टीका करत आम आदमी पक्षाने या दरवाढीचा तीव्र निषेध केला आहे.



























































