
कॅनडाहून आपल्या भावाला भेटण्यासाठी हिंदुस्थानात आलेल्या डॉ. आशा गोयल हत्या प्रकरण 17 वर्षांनंतरही निकाली निघालेले नाही. या प्रकरणात आशा गोयल यांची हत्या कोणी केली, हे स्पष्ट होत नसल्याने प्रकरण 17 वर्षांपासून रखडले आहे. आशा गोयल यांचा मुलगा संजय गोयल डॉक्टर असून हे प्रकरण मार्गी लावण्यासाठी आतापर्यंत 80 वेळी हिंदुस्थानात आला आहे. मात्र, अजूनही हे प्रकरण रखडलेले आहे. आता या प्रकरणी 13 जानेवारीला मुंबईतील सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यावेळी या प्रकरणातील मुख्य आरोपींविरोधात खटला चालवण्याबाबत न्यायालय निर्णय घेणार आहे.डॉ. आशा गोयल यांची 22 ऑगस्ट 2003 रोजी हत्या झाली होती.
आशा गोयल भाऊ सुरेश अग्रवाल याला भेटण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी सुरेश यांनी त्यांचा जावई नरेंद्र गोयल आणि मनोहर शिंदे आणि पवन अग्रवाल या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आशा यांची हत्या केल्याचा आरोप आहे. प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सुरेश अग्रवाल आणि मनोहर शिंदे यांचा मृत्यू झाला आहे. तर आशा गोयल यांचा दुसरा भाऊ सुभाष गोयल फरार असून तो कॅनडात राहतो. त्याच्याविरोधात इंटरपोल वॉरंट जारी झाले आहे. मात्र, पुढे काहीही कार्यवाही झालेली नाही. आता या प्रकरणात प्रदीप परब नावाच्या कर्मचाऱ्याला सरकारी साक्षीदार बनवण्यात आले आहे.
याआधी सत्र न्यायालयाने नरेंद्र अग्रवाल याला मुक्त केले होते. मात्र, सरकारने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला. या प्रकरणी पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबाचा योग्य तो अभ्यास केल्यानंतरच कोणलाही मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे न्यायमूर्ती मृदुला भटकर यांनी स्पष्ट केले आहे.





























































