प्रलंबित मागण्यांसाठी आशा आणि गटप्रवर्तक महिलांचे धरणे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक संघटनेने सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कामांचा दर्जा द्या, ही प्रमुख मागणी करण्यात आली. आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात निर्दर्शने केली. या आंदोलनात प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.

आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कामाचा दर्जा द्या, आशा महिलांना दरमहा 18 हजार रुपये आणि गटप्रवर्तक महिलांना 21 हजार रुपये वेतन लागू करावे, 16 सप्टेंबर 2019 रोजीच्या शासकीय आदेशानुसार आशा कर्मचाऱ्यांच्या मोबदल्यात 2 हजार रुपयांची वाढ मंजूर केली आहे. ही वाढ 1 एप्रिल 2019 पासून लागू करावी, गटप्रवर्तक महिलांना 3 हजार 500 रुपयांची करण्यात आलेली वाढही त्यावेळेपासूनच लागू करावी, आशा व गटप्रवर्तक महिलांना भविष्यनिर्वाह निधीचा कायदा लागू करावा, पूरस्थितीच्या वेळी आशा कर्मचाऱ्यांनी केलेल्या सेवेचा मोबदला त्यांना मिळावा, आशांना दरवर्षी गणवेशासाठी 1 हजार 500 रुपये मोबदला देण्यात यावा, अशा विविध मागण्यांचा समावेश त्यात आहे. त्याचबरोबर 1 जानेवारी रोजी कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात सहभागी होण्याचा इशाराही आशा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. यावेळी संघटनेचे नेते शंकर पुजारी, सुमन पुजारी यांच्यासह आशा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.