आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा, कोलते दांपत्य ठरले मानाचे वारकरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आषाढी एकादशीला (दि. 20) पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत महापूजेचा मान मंदिरातील विणेकरी केशवराव शिवदास कोलते आणि त्यांच्या पत्नी इंदुबाई यांना मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

आषाढी एकादशीची महापूजा प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांनी करावी यासाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महापूजेचे निमंत्रण दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे निमंत्रण स्वीकारत महापूजेला येत असल्याचे औसेकर यांनी सांगितले.

मानाचे वारकरी ठरलेले 71 वर्षीय केशवराव कोलते विदर्भातील वर्धा येथील आहेत. गेल्या 20 वर्षांपासून ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात वीणा वाजवून पहारा देत आहेत. मागील वर्षीपासून कोरोनामुळे वारी प्रतीकात्मक स्वरूपात साजरी होत असल्याने महापूजेत सहभागी होण्याचा मान विणेकऱयांना देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला होता. कोलते दांपत्याची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली. यासाठी दोन विणेकऱयांच्या नावाच्या चिठ्ठय़ा टाकण्यात आल्या होत्या. यामध्ये बापू साळुजी मुळीक यांचाही समावेश होता.