
रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे बिथरलेल्या अमेरिकेने हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधारी हिंदुस्थानवर अधिकचा 25 टक्के टॅरिफ लावणार असल्याची घोषणा केली. यामुळे हिंदुस्थान व अमेरिकेचे संबंध ताणले गेलेले असतानाच अमेरिकेने पाकिस्तानशी पुन्हा जवळीक साधली आहे. पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल असीम मुनीर हे पुन्हा एकदा अमेरिकेत पोहोचले आहेत.
अमेरिकेचे सेंट्रल कमांडचे जनरल मायकल कुरीला यांच्या फेअरवेल सोहळ्याचे आसीम मुनीर यांना निमंत्रण पाठवण्यात आले होते. त्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मुनीर हे फ्लोरिडा येथे पोहोचले आहेत. हे तेच जनरल कुरीला आहेत ज्यांना काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने निशान ए इम्तियाज या मेडलने सन्मानित केले होते.
याआधी देखील हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असतानाच डोनाल्ड ट्रम्प वेगळेच राजकारण करत होते. पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. त्यानंतर ट्रम्प यांनी मध्यस्थी करून दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी केल्याचा दावा केला. त्या दाव्यावर मोदींनी अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. याचदरम्यान ट्रम्प यांनी अमेरिकेच्या 250 व्या आर्मी डे परेडसाठी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना निमंत्रण दिले होते. त्या कार्यक्रमासाठी मुनीर हे 12 जून रोजी अमेरिकेत दाखल झालेले व 14 जूनच्या समारंभात सहभागी देखील झालेले.