बगदादीनंतर अब्दुल्लाह कार्दश बनला इसिसचा म्होरक्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया अर्थात इसिस या कुख्यात दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबु बकर अल बगदादी याला अमेरिकन सैन्याने कंठस्नान घातलं. आता इसिसने आपल्या नव्या म्होरक्याची निवड केली आहे.

अब्दुल्लाह कार्दश नावाचा दहशतवादी आता इसिसचा म्होरक्या झाला आहे. अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्दस हा इराकचा माजी हुकूमशहा सद्दाम हुसैन याच्या सैन्यात काम करायचा. बगदादी हा कोणत्याही दहशतवादी कारवायांमध्ये प्रत्यक्ष समाविष्ट नसे. तो फक्त योजनेला मंजुरी देणे आणि तरुणांचा ब्रेनवॉश करून त्यांना इसिसमध्ये सामील करून घेणे ही काम बगदादी करत होता. बगदादीच्या आज्ञेचं पालन करून त्याची अंमलबजावणी करण्याचं काम कार्दश याच्या नेतृत्वात होत होतं, अशी माहिती उघड झाली आहे.

इसिसच्या काही कामांची जबाबदारी आधीच कार्दशने उचलली होती. त्यामुळे आता तोच इसिसचा म्होरक्या असणार आहे. 2019च्या ऑगस्ट महिन्यात बगदादी हवाई हल्ल्यात जखमी झाला होता. त्यानंतर त्याने इसिसची सूत्रं कार्दशकडे सोपवली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इसिसच्या या धोरणावरूनही इशारा दिला आहे. बगदादी याच्या नेतृत्वाचा वारसा सांभाळणाऱ्यांविषयीही आम्हाला माहीत आहे आणि त्यांच्यावर आमची करडी नजर आहे, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.