ठसा- प्रा. डॉ. विठ्ठल मोरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभय मिरजकर

आयुष्यभर पुरोगामी मूल्यांवर निष्ठा ठेवणारे तत्त्वनिष्ठ अशी ओळख प्रा. डॉ. विठ्ठल मोरे यांना लाभली होती. विविध शोषित घटकांसाठी कायम संघर्ष करणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने संघर्षशील नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे. मोरे यांचा जन्म 14 एप्रिल 1948 रोजी एका शेतकरी कुटुंबात लातूर जिह्यातील ताडकी गांजूर येथे झाला. त्यांनी स्वतःच्या कष्टाच्या बळावर आपले स्थान जिल्ह्यात निर्माण केले. दीन- दलित, कष्टकरी, कामगार, शोषित, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, शेतकरी, शेतमजूर, अंगणवाडी कार्यकर्ते अशा विविध शोषित घटकांसाठी त्यांनी कायम संघर्ष केला.

आयुष्यभर त्यांनी पुरोगामी मूल्यांवर निष्ठा ठेवलेली होती. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या विठ्ठल मेरे यांनी आपल्या जिद्दीने राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेली होती. बार्शी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात सर्वप्रथम ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विद्यार्थीदशेपासूनच त्यांनी कम्युनिस्ट विचारधारा जपलेली होती. त्यांच्या जीवनावर क्रांतिसिंह नाना पाटील, अण्णाभाऊ साठे, कॉ. भाई उद्धवराव पाटील, कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे, व्ही.डी. देशपांडे याच्या विचारांचा पगडा होता. ग्रामीण भागातील विचार करणारा प्राध्यापक या नात्याने त्यांनी जीवनभर अनेक चळवळीत सहभाग घेतला, अनेक आंदोलने केली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्य करण्याचा निर्धार त्यांनी केला आणि संघटनेत स्वतःच्या कर्तृत्वावर अनेक पदांवर काम केले. छात्र संघर्ष, युवा संघर्ष, क्रांतिज्योती अशा विद्यार्थी संघटनांचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले.

1974 मध्ये झालेल्या मराठवाडा विकास आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन या आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले. त्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. समाजात प्रत्यक्ष परिवर्तन घडवून आणण्यासाठी झटणारे, उपेक्षितांचे ते सहकारी होते. युवकांचे ते आयकॉन होते. रेणापूर येथील शिवाजी महाविद्यालयात त्यांनी प्राचार्य पदाची जबाबदारी स्वीकारली. विद्यार्थ्यांचे आवडते प्राध्यापक आणि प्राध्यापकांचे आवडते प्राचार्य अशी त्यांची ओळख निर्माण झालेली होती.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी किल्लारी येथे भगतसिंग महाविद्यालयाची स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीटाचे सिनेट सदस्य, विद्या परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले. स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया, डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी युवक संघटनांचे ते महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष होते. प्राध्यापकांच्या मुक्टा व एमफुक्टो या संघटनांचे पदाधिकारी राहिले असून विद्यापीठाच्या सिनेट, व्यवस्थापन परिषद व विद्वत परिषदेचे सदस्य, राज्यशास्त्र्ा अभ्यास मंडळाचे चेअरमन, तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सचिव मंडळाचेही ते सभासद राहिले आहेत. छात्र संघर्ष, युवा संघर्ष व क्रांतिज्योत या नियतकालिकांचे संपादक राहिले असून सध्या ‘विचारमंथन’ या राज्यशास्त्र विषयातील संशोधन पत्रिकेचे प्रमुख संपादक होते. तसेच माकपचे मुखपत्र ‘जीवनमार्ग’ या साप्ताहिकाच्या संपादक मंडळावर होते. कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी, जि. धाराशीव येथे तीस वर्षे राज्यशास्त्राचे विद्यार्थीप्रिय, प्राध्यापकप्रिय प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. शिवाजी महाविद्यालय, रेणापूर, जिल्हा लातूर व शहीद भगतसिंग महाविद्यालय, किल्लारी, जि. लातूर येथे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम केले. ते महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे अध्यक्ष राहिले. राज्यशास्त्र या विषयातील मौलिक योगदानाबद्दल त्यांना प्रा. दत्ता चौघुले स्मृती पुरस्कार, स्वामी विवेकानंद पुरस्कार व विशेष सेवा योगदान व उपक्रमशीलतेबद्दल स्वामी विवेकानंद भूषण पुरस्कार मिळाले आहेत .