मंत्रालय होतेय फरार आरोपींचा अड्डा

26

राजेश चुरी । मुंबई

राज्याचा कारभार जिथून चालतो ते मंत्रालय सध्या वॉण्टेड आरोपींचे आश्रयस्थान होत आहे. कारण पुण्यातून फरार झालेल्या एका आरोपीला शुक्रवारी पोलिसांनी मंत्रालयाच्या व्हीआयपी लॉबीत ताब्यात घेण्याची घटना घडली. फरार आरोपींच्या वावरामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यामध्ये प्रकाश मेश्राम या आरोपीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. पुणे पोलीस अनेक दिवस त्याच्या मागावर होते. प्रकाश मेश्राम मंत्रालयात जाणार असल्याची माहिती पुणे पोलिसांना त्यांच्या खबरींनी दिली होती. पुणे पोलिसांनी मेश्रामचा फोटो मरीन लाइन्स पोलिसांना पाठवला. मरीन लाइन्स पोलिसांनी या फरार आरोपीचा फोटो मंत्रालय पोलिसांना पाठवला. मंत्रालय पोलिसांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेश्रामचा फोटो टाकला. या ग्रुपवरील पोलिसांनी या फोटोतील चेहरा नीट पारखून घेतला. दुपारी मंत्रालयाच्या व्हीआयपी लॉबीत मेश्रामला बंदोबस्तावरील पोलिसांनी पाहिले. त्यांनी मेश्रामला घेरले आणि नाव-गाव विचारले, पण त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसी खाक्या दाखवल्याबरोबर त्याने आपणच प्रकाश मेश्राम असल्याचे मान्य केले. मेश्रामला ताब्यात घेऊन मरीन लाइन्स पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

अतिरेकी कारवायांचा मंत्रालयाला धोका असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर फरार आरोपींचा मंत्रालयातील वावर पोलिसांच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरला आहे. कारण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी सात ते साडेसात हजार व्हिजिटर्स मंत्रालयात येतात. सर्वांच्या हालचालींवर लक्ष ठेवताना पोलीस यंत्रणा अपुरी पडत आहे.

अंबरनाथचा अजय गुप्ता
काही महिन्यांपूर्वी अंबरनाथमधून फरार झालेल्या अजय इंद्रजीत गुप्ता याला मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावर महिला पोलिसाने संशयावरून अटक केली. गृहखात्यात आलेल्या गुप्ताने तोंडाभोवती रुमाल गुंडाळला होता. महिला पोलिसाला संशय आल्याने तिने वरिष्ठांना ही माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर गुप्ता वॉण्टेड असल्याची माहिती पुढे आली.

आपली प्रतिक्रिया द्या