
सामना प्रतिनिधी, मुंबई
पश्चिम रेल्वेवर देशातील पहिलीच वातानुकूलित लोकल सुरू झाल्याच्या घटनेला येत्या नाताळला 25 डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या लोकलच्या चर्चगेट ते विरार केवळ 12 फेऱ्या होत असून त्यातील केवळ दोनच फेऱया या प्रत्यक्षात गर्दीच्या पिकअवरमध्ये धावतात. एसी लोकलची दिवसाची सरासरी कमाई सहा लाख होत असून 25 डिसेंबर 2017 ते 17 डिसेंबर 2018 पर्यंत एसी लोकलची एकूण कमाई 16 कोटी 77 लाख 22 हजार 773 रुपये इतकी झाली आहे.
पश्चिम रेल्वेवर 25 डिसेंबर 2017 रोजी एसी लोकलला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या एसी लोकलच्या 12 फेऱयांमुळे साध्या विनावातानुकूलित लोकलच्या 12 फेऱयांना रेल्वे प्रवाशांना मुकावे लागत असल्याने या नव्या एसी लोकलला सुरुवातीला विरोध झाला, परंतु आता हळूहळू ओला-उबेरने जाणारे प्रवासी या एसी लोकलकडे वळू लागले. या लोकलना सुरुवातीला जलद मार्गावरील थांब्यावरच हॉल्ट देण्यात आला होता. त्यानंतर मुंबई सेंट्रल ते चर्चगेटपर्यंतच्या सर्वच स्थानकांवर या गाडीला थांबा देण्यात आला आहे.
आता या एसी गाडीला 25 डिसेंबर 2017 ते 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत 38.68 लाख प्रवासी लाभले आहेत. त्यातील 35.74 लाख प्रवासी पासधारक होते तर 2.94 लाख प्रवासी कार्ड तिकीटधारक होते. 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार 31.40 लाख प्रवासी लाभले. त्यात 29.15 लाख प्रवासी हे पासधारक होते तर 2.25 लाख प्रवासी हे कार्ड तिकीटधारक होते. संपलेल्या नोव्हेंबर महिन्यात एसी गाडीला 4.08 लाख प्रवासी लाभले. त्यात 3.79 लाख पासधारक तर 29 हजार कार्ड तिकीटधारक आहेत.
आणखी बारा एसी लोकल ‘भेल’च्याच
चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यात बांधलेल्या या एसी लोकलच्या मोटर आणि इतर विद्युतीकरणाचे काम ‘भेल’ अर्थात भारत हेवी इलेक्ट्रिकल लि.ने केले आहे. संपूर्ण लोकलचा खर्च 54 कोटी रुपये आला आहे. आता आणखी दहा ते बारा एसी लोकल बनविण्याचे कामदेखील ‘भेल’ अर्थात बीएचईएल या कंपनीला देण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच मुंबईकरांचा रोजचा घामाघूम करणारा प्रवास आता गारेगार होणार आहे.
सहा हजार क्षमतेच्या गाडीत 1393 प्रवासी
बारा डब्यांच्या गाडीमध्ये 1028 आसने असून एकूण प्रवासी क्षमता 5964 इतकी आहे. सध्या प्रत्येक गाडी एका फेरीत सरासरी 1393 इतकेच प्रवासी प्रत्यक्षात लाभत आहेत. या गाडीचे भाडे फर्स्ट क्लासच्या भाडय़ाच्या 1.3 पट इतके आहे.




























































